फिरायला नेले आणि अडीच लाखांत विकले प्रियकराने प्रेयसीला
प्रतिनिधी
नागपूर :- फिरायला जाण्याच्या बहाण्याने राजस्थानात नेल्यानंतर प्रेयसीचा अडीच लाखांत सौदा केला. प्रियकराने पैसे घेऊन एका वृद्धासोबत तिचे लग्न
लावून दिले आणि पळ काढला. सहा महिन्यांनी तरुणीने आईला फोन केल्यानंतर प्रियकराचे पाप उघडकीस आले. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षांची तरुणी रिया (बदललेले नाव) आईसह इमामवाडा परिसरात राहते. ती केटरर्सच्या कामाला जात होती. तिचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, तिचा पती दारुडा निघाला आणि कामही करीत नव्हता. त्यामुळे ती वर्षभरातच माहेरी परतली. तिची ओळख अशोक चौकात राहणाऱ्या राहुल मेश्राम याच्याशी झाली. त्यांची मैत्री झाली.
रिया एकटीच राहत असल्याचे त्याच्या लक्षात येताच तिच्याशी जवळीक वाढवली. तो तिला इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामाला न्यायला लागला. कामावरून यायला उशीर होत असल्यामुळे दोघेही अनेकदा बाहेरगावी मुक्कामी राहत होते. राहुलने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचे राहुलने सांगितले. ती तयार झाली. दोघेही पती-पत्नी प्रमाणे राहू लागले. दोघेही सोबतच कामाला जात होते आणि एकत्र राहत होते.
प्रियकराने रचला विक्रीचा कट
राहुलने रियाला राजस्थान फिरायला जाण्याचा बेत असल्याचे सांगितले. त्याने आपला साथीदार जमनालाल याला रियाला विकण्याच्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतले. दोन महिन्यांपूर्वी तिघेही राजस्थानला गेले. तेथे रियाला एका वृध्द व्यक्तीच्या घरी नेले. तिचे बळजबरी त्या वृद्धासोबत लग्न लावून दिले. वृद्धाकडून अडीच लाखांची रक्कम घेतली आणि पळून आले.
जीन्स आणि टीशर्ट घालणाऱ्या रियाला राजस्थानमध्ये चोवीस तास घुंघटमध्ये राहावे लागत होते. तिला मारहाणीसारख्या अत्याचाराचाही सामना करावा लागत होता. तसेच तिला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते. तिला घरी बोलू देत नव्हते. त्यामुळे तिचा कोंडमारा होत होता. ती शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळली होती.
अशी आली घटना उघडकीस
सहा ऑक्टोबरला तिच्या हाती पतीचा मोबाईल लागला. तिने घरी कुणी नसल्याची संधी साधून नागपुरात राहणाऱ्या आईला फोन केला. ‘मला अडीच लाखांत विकले असून, येथे अडकली आहे. मला बाहेर काढ. मी खूप संकटात आहे.’ असे आईला सांगितले. तिच्या आईने मुलीवरील संकट बघता इमामवाडा ठाणे गाठले. निरीक्षक मुकुंद साळुंखे यांनी माहिती घेत त्वरित गुन्हा दाखल केला तसेच तरुणीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले.