1944  मध्ये आजच्याच दिवशी 800 रोमानी मुलांना भयानक पद्धतीने मारण्यात आले होते!

49

1944  मध्ये आजच्याच दिवशी 800 रोमानी मुलांना भयानक पद्धतीने मारण्यात आले होते!

आजचा दिवस  जगाच्या इतिहासात काळादिवस म्हणून नोंदला गेला आहे. आजच्या दिवशी 1944 साली 800 रोमानी लहान मुलांची हत्या करण्यात आली होती. यातील काही मुले तर 9 ते 14 वर्षे वयाची होती. हिटलरचा राक्षसीपणा आपणाला माहिती आहे, पण ही घटना खूप कमी लोकांना माहिती असेल.
हिटलरच्या निर्दयीपणाचे केंद्र होते, पोलंडमधील ऑश्वित्ज. नाझी सरकारच्या काळात ऑश्वित्ज सर्वात मोठे नजरबंदी कॅम्प होते. नाझीचे अधिकारी गुप्त पद्धतीने यूरोपातील ज्यू लोकांना पकडून येथे आणायचे. यातील अनेक लोकांना कॅम्पमध्ये पोहोचल्यानंतर गॅस चेंबरमध्ये टाकून मारले जात असे. अनेकांना मरणाची वाट पाहावी लागत असे. कॅम्पमध्ये आलेल्या ज्यूंचे केस कापले जायचे, त्यानंतर अंगावरील कपडे काढून त्यांना चिंध्या घालण्यासाठी दिल्या जायच्या.

ऑश्वित्ज कॅम्पांचे एक समुह होते, ज्यांना 1,2,3 असे नाव देण्यात आले होते. याठिकाणी ४० छोटे कॅम्प सुद्धा होते, यांना ऑश्वित्ज द्वितीय असं म्हटलं जायचं. नाझीच्या एसएस एजेंसीने याठिकाणी मृत्यूची सारी तयारी करुन ठेवली होती. अत्यंत भयानक मृत्यू देण्याचे सर्व मार्ग याठिकाणी अवलंबले जायचे. 300 तुरुंग खोल्या, चार बाथरुम, भट्टी, शव ठेवण्यासाठी गोदाम असं सर्व काही येथे होते. हजारो ज्यू नागरिकांना वैद्यकीय प्रयोगांसाठी येथे वापरलं जायचं. हा कॅम्प जोसेफ मेंजलच्या देखरेखेखाली चालायचा.

7 ऑक्टोंबर 1944 साली एक छोटे बंड झाले होते, ज्यू कैद्यांना शवांना गॅस चेंबरपासून भट्टीपर्यंत घेऊन जाण्यास जबरदस्ती केली जात होती. यावेळी संतापलेल्या काही लोकांनी विस्फोटकांचा वापर करत गॅस चेंबर उडवले होते आणि दुसऱ्या एका गॅस चेंबरला आग लावली होती. या विस्फोटकांची ज्यू महिलांच्या साह्याने तस्करी करण्यात आली होती. त्या जवळच्याच एक शस्त्र कारखाण्यात काम करत होत्या.

बंडामध्ये सामिल असलेल्या 450 पैकी 250 कैदी गोंधळादरम्यान पळून जाण्यात यशस्वी झाले होते. या सर्वांना पुढे पकडण्यात आले आणि गोळ्या घालण्यात आल्या. नंतर 10 ऑक्टोंबर रोजी 800 रोमानी मुलांना गॅस चेंबरमध्ये टाकून मारण्यात आले होते.
हिटलरच्या काळात रोमानी लोकांवर क्रूर अत्याचार करण्यात आले होते. जवळजवळ 15 लाख रोमानी नागरिकांची हत्या करण्यात आली होती. 1950 मध्ये रोमानी लोकांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. मात्र, जर्मन सरकारने त्यांना कोणतीही मदत दिली नाही. वंशवादामुळे नाही, तर गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्यांना मारण्यात आले होते, असे स्पष्टीकरण जर्मन सरकारकडून देण्यात आले होते.