दारू माफियांची अजब आयडिया! जनावरांच्या चाऱ्यात लपवून दारूसाठा शहरात

51

दारू माफियांची अजब आयडिया! जनावरांच्या चाऱ्यात लपवून दारूसाठा शहरात

चंद्रपूर : दारूतस्करीसाठी माफियांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या आहेत. त्यांच्या भन्नाट कल्पनेने कारवाई करणारे पोलिससुद्धा चक्रावले आहेत. मात्र, आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईने माफियांची पुन्हा नवीन क्लृप्ती या निमित्ताने समोर आली आहे. जनावरांचे खाद्य असलेल्या ‘कुटार’ भरलेल्या चारचाकी वाहनात स्वतंत्र कप्पा करून मद्यपींची “खुराक’ पोहोचविली जात असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत तब्बल साडेबारा लाखांचा देशीदारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात शेतीचा हंगाम सुरू आहे. जनावरांना चाऱ्याची आवश्यकता असते. त्यामुळे शेतकरी जनावरांचे पोषण करण्यासाठी “कुटार’ या चाऱ्याची मागणी करीत असतात. हीच संधी साधून दारू माफियांनी चारचाकी वाहनात जनावरांचा कुटार भरला. त्यानंतर दारूच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र कप्पा तयार केला. या कप्प्यात देशीदारूचे तब्बल 76 बॉक्स ठेवून गंजवॉर्डात वाहन पोहोचले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक श्री. गदादे, नितीन साळवे, प्रकाश बल्की, अमजद खान, नितीन रायपुरे, जमीर पठाण यांचे पथक रात्रीच्या सुमारास गस्तीवर होते. जनावरांचा कुटार असलेले वाहन बेवारसस्थितीत आढळून आले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी वाहनाबाबत चौकशी केली. परंतु, कुणीही घटनास्थळी आले नाही.
पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहनाच्या सभोवताल चौकशी केली. चौकशीदरम्यान वाहनातून काही तरी पडल्याचा आवाज आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिस पथकाने तातडीने वाहनाची झडती घेतली असता वाहनावर जनावरांचा चारा असलेले कुटार काही पोत्यांत आढळून आले. तर, एका स्वतंत्र कप्प्यात देशी दारूचे तब्बल 76 बॉक्स आढळून आले.
माफियांची ही भन्नाट कल्पना पोलिसांनी मोडीत काढत अखेर ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी चारचाकी वाहन आणि दारूसाठा असा एकूण 12 लाख 61 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.