वर्षभरापासून मानधन थकीतीमुळे, चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्डवर उपासमारीची वेळ

65

वर्षभरापासून मानधन थकीतीमुळे, चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्डवर उपासमारीची वेळ

चंद्रपूर:- गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील होमगार्डांना त्यांचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे होमगार्डांचे सर्व थकीत मानधन दिवाळीपूर्वी देण्यात यावे, अशी मागणी होमगार्डनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील होमगार्डांनी आपल्या काही न्याय्य मागण्याही शासनदरबारी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

एक ऑक्‍टोबर 2019 ते 10 जानेवारी 2020 पर्यंतचे कायमस्वरूपी बंदोबस्ताचे, तर सप्टेंबर ते डिसेंबर 2019 पर्यंतच्या साप्ताहिक कवायतीचे भत्ते अद्याप होमगार्डांना मिळाले नाहीत. त्यामुळे सरकारनेही होमगार्डांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

ज्या महिला होमगार्ड ज्या पोलिस ठाण्याअंतर्गत राहतात, त्यांना त्यांच्या भागात बंदोबस्तासाठी लावण्यात यावे, कायमस्वरूपी बंदोबस्त निधीअभावी बंद करण्यात आला. तो पूर्ववत सुरू करण्यात यावा, कोरोना काळात 45 वर्षांवरील होमगार्डला बंदोबस्तात घेण्यात आले नाही. त्यांना बंदोबस्तात घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

होमगार्डना अनुभवपत्र द्या

त्याचप्रमाणे पोलिस भरतीत होमगार्डला अनुभव विचारला जातो. हे लक्षात घेऊन त्यांना अनुभव पत्र देण्यात यावे, या मागण्याही करण्यात आल्या. दिवाळीत आर्थिक गरज लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व होमगार्डना त्यांचे सर्व थकीत मानधन देण्यात यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. याप्रसंगी अमोल नागपुरे, आझाद वाघमारे, नीलेश शेरकी, विठ्ठल धाबेकर, निखिल सातारकर, सचिन घाईत, भारती उंदिरवाडे, पुष्पा कुक्कुडवार यांची उपस्थिती होती.