नागपूर वाळू तस्करांनकडुन चिरीमिरी घेणारे चार पोलीस निलंबित.

नागपूर पोलीस उपायुक्त निलोत्पल यांचा कारवाईमुळे कोराडी पोलीस ठाण्यात खळबळ 

प्रतिनिधी पल्लवी मेश्राम

नागपूर :- वाळू तस्करांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश असतानाही वाळू तस्करांना सहकार्य करणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना बुधवारी पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी निलंबित केले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेशसिंग ठाकूर, शिपाई रवी लोणारकर, सुरेश मिश्रा व विष्णू हेडे अशी निलंबित  पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सर्व कर्मचारी कोराडी पोलीस ठाण्यातील गृह अन्वेषण पथकात कार्यरत आहेत. छिंदवाडा, मध्यप्रदेशातून  वाळूने भरलेले ट्रक नागपुरात येत असल्याची गोपनीय माहिती मंगळवारी रात्री परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांना मिळाली.

या माहितीच्या आधारावर त्यांनी कोराडी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. उपायुक्तांच्या आदेशानंतर पोलिसांना सापळा रचून  एक ट्रक पकडला.ट्रक चालकाकडे रॉयल्टी पास होती. चालकाने जवळपास 5 टन वाळू अधिक असल्याने ती दुसरीकडे रिकामी करण्यासाठी पोलिसांना चिरीमिरीचे आश्वासन दिले. त्यानंतर पोलिसांनी चालकाल वाळू रिकामी करण्यास मदत केली.

दरम्यान पोलीस उपायुक्त पोलीस ठाण्यात पोहोचले व त्यांनी शहानिशा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रकचालकाने एकाच रॉयल्टीवर दोनदा वाळू शहरात आणली होती. ही रॉयल्टी नागपूर ते वर्धा मार्गाकरीता होती. पोलिसांच्या मदतीने आपण 5 टन वाळू दुसरीकडे रिकामी केल्याचे ट्रकचालकाने सांगितले. पोलिसांच्या या कृत्याची पोलीस उपायुक्तांनी गांभीर्याने दखल घेतली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर रात्रीच ताबडतोब चौघांनाही निलंबित करण्यात आले.

दोन वाळू तस्करांना अटक

पोलीस आयुक्तांनी शहरात अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरही वाळू तस्करांना मदत करण्याची हिंमत करणे अतिशय चुकीचे असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून ट्रकचालक उमेश ऊर्फ बाल्या बनकर रा. कोराडी आणि जावेद खान रा. गिट्टीखदान या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी अल्पवयीन असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here