लाच स्वीकारताना एनआयटीचा शिपाई अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 95275 26914 📲
नागपूर :- नागपुर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुर लाचलुचपत प्रतिबंधक टिमने नागपुर येथील एनआयटी येथील कार्यारत शिपायाला 15 हजारांची लाच घेताना अटक केली आहे. खूप दिवसांनंतर एनआयटीचा कर्मचारी लाच घेताना सापडला आहे. विजय गौरीनंदनसिंह चौहाण वय 50 वर्ष असे लाच घेणा-या आरोपीचे नाव आहे. या प्रकारामुळे एनआयटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
आरोपी चौहाण एनआयटीच्या पूर्व विभागीय कार्यालयात शिपाई आहे. तर, तक्रारकर्ता हे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. त्यांनी भामटीत दोन प्लॉट खरेदी केले होते. प्लॉटचे डिमांड लेटर तसेच आर. एल. लेटरसाठी त्यांनी 27 एप्रिल आणि 4 ऑक्टोबरला एनआयटीच्या कळमना येथील विभागीय कार्यालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर काहीच कारवाई न झाल्यामुळे त्यांनी शिपाई चौहाण याच्याशी संपर्क साधला.
चौहाणने एका महिन्यात काम करून देतो असे सांगून त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर चौहाणने तक्रारकर्त्याला कार्यालयात बोलावून चलानचे 17 हजार रुपये मागितले. 17 हजार रुपये नसल्यामुुळे तक्रारकर्त्याने चौहाणला चार हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम दुसऱ्या दिवशी खामलात सोपविले. त्याची चौहाणने तक्रारकर्त्याला पावतीही दिली नाही. त्यानंतर चौहाणने तक्रारकर्त्याला दोन्ही प्लॉटचे डिमांड आणि आर. एल. लेटर काढून देण्यासाठी 50 हजार मागितले. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारकर्त्याने एसीबीत तक्रार दिली. प्राथमिक तपासात खात्री झाल्यानंतर एसीबीने चौहाणला पकडण्याची योजना आखली. चौहाणने 50 हजारांपैकी बुधवारी 15 हजार रुपये देण्यास सांगितले. तक्रारकर्ते पैसे घेऊन कळमना येथील एनआयटीच्या विभागीय कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांच्याकडून पैसे घेताना एसीबीने त्याला रंगेहात अटक केली.
त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक योगिता चाफले, निरीक्षक संजीवनी थोरात, अचल हरगुडे, अनिल बहिरे, अमोल मेंघरे, निशा उमरेडकर, रेखा यादव, सदानंद सिरसाठ यांनी पार पाडली.