लज्जास्पद पराभवाने कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंगले

श्याम ठाणेदार

मो: ९९२२५४६२९५

दौंड: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचू शकला नाही. उपांत्यफेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आल्याने कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींचे विश्वविजयाचे स्वप्न भंगले. गुरुवार हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अतिशय निराशाजनक दिवस ठरला वास्तविक या दिवसाची सुरवात झाली तेंव्हा भारत इंग्लंड विरुद्ध उपांत्य सामना सहज जिंकेल आणि रविवारी पाकिस्तानशी अंतीम सामन्यात भिडले असा विश्वास कोट्यवधी भारतीय क्रिकेट प्रेमींना होता. मात्र भारतीय खेळाडूंनी जी निराशाजनक कामगिरी केली त्यावरून कोट्यवधी क्रिकेटप्रेमींची निराशा तर झालीच पण लाजिरवण्या पराभवाने क्रिकेट प्रेमींच्या संतापाची लाट देखील उसळली आहे आणि ती साहजिकच आहे कारण जय पराजय हा खेळाचाच भाग आहे.

विजयामुळे कोणी मोठा होत नाही आणि पराभवामुळे कोणी संपत नाही मात्र तुम्ही कशाप्रकारे पराभूत होता यावर सर्व अवलंबून आहे. उपांत्य फेरीत ज्याप्रकारे भारतीय संघाने पराभव स्वीकारला तो पचवणे क्रिकेट प्रेमींना कठीण जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १६९ धावा काढल्या. या धावा उपांत्यफेरीच्या मानाने कमी होत्या या सामन्यात भारतीय संघाकडे किमान १९० धावा आवश्यक होत्या मात्र त्यासाठी सर्वच फलंदाजांनी चांगली फलंदाजी करणे आवश्यक होते मात्र विराट कोहली आणि हार्दिक पांड्या वगळता सर्व खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. सुर्यकुमार यादवने संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली मात्र कधीतरी तो लवकर बाद होणारच होता दुर्दैवाने उपांत्यफेरीत त्याची बॅट तळपली नाही. सलामीवीर के एल राहुल, रोहित शर्मा यांचा फ्लॉप शो उपांत्यफेरीतही सुरूच राहिला त्यामुळे भारताला आवश्यक ती धावसंख्या उभारता आली नाही असे असले तरी १६९ धावा देखील लढण्यासाठी पुरेशा होत्या पण आपल्या गोलंदाजांनी मात्र अतिशय निराशाजनक कामगिरी केली. आपल्या गोलंदाजांना इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही. अवघ्या सोळा षटकात त्यांनी १७२ धावा चोपून भारताला स्पर्धेबाहेर ढकलले.

भारतीय गोलंदाजांची ही निराशाजनक कामगिरी चीड आणणारी होती कारण आपले सर्वच गोलंदाज अनुभव असूनही त्यांना एकाही फलंदाजाला बाद करता न येणे ही मोठी नामुष्कीची बाब आहे अर्थात अशी नामुष्की येण्याची ही पहिली वेळ नाही. मागील वर्षी झालेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामान्यातच पाकिस्तानने भारताने दहा विकेटने धुव्वा उडवला होता. त्याचीच पुनरावृत्ती या विश्वचषकातही झाल्याने क्रिकेट प्रेमींना संताप येणे साहजिकच आहे. विशेष म्हणजे २०१४ नंतर भारताने आयसीसीच्या स्पर्धेत सातत्याने पराभव स्वीकारला आहे. कधी उपांत्य तर कधी अंतिम फेरीत भारत पराभूत झाला आहे. याचाच अर्थ आपणही दक्षिण आफ्रिकेप्रमाणे चॉकर्स ठरत आहोत. बाद फेरीचा अडथळा पार करण्यात भारताला अपयश का येत आहे याचा खेळाडू आणि बीसीसीआयने गांभीर्याने विचार करावा.

अर्थात या पराभवाला केवळ खेळाडूच जबाबदार आहेत असे नाही तर निवड समिती आणि संघ व्यवस्थापन देखील तितकेच जबाबदार आहे. के एल राहुलच्या खराब प्रदर्शनानंतरही त्यालाच खेळवण्याचा हट्ट संघ व्यवस्थानला नडला. अश्विन आणि अक्षर पटेल ही फिरकी जोडी मधल्या षटकात विकेट मिळवण्यात अपयशी ठरत असतानाही संघ व्यवस्थ्यापणाने युजुवेंद्र चहलला संधी दिली नाही. या स्पर्धेत भारतीय संघाकडून केवळ विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि अर्षदीप सिंग यांनीच लौकिकाला साजेशी खेळी केली बाकीच्यांनी मात्र निराशा केली. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तीन – चार खेळाडूंच्या बळावर तुम्ही एखादा सामना जिंकू शकता मात्र एखादी स्पर्धा त्यातही विश्वचषकासाराखी मोठी स्पर्धा जिंकायची असेल तर सर्व ११ खेळाडूंनी चांगली कामगीरी करायला हवी. आता या पराभवातुन तरी धडा घेऊन निवड समिती, संघ व्यवस्थापन आणि भारतीय खेळाडूंनी नव्याने सुरवात करायला हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here