श्रीवर्धन वाळवटी मार्गावरील पूल धोकादायक स्थितीत; अवजड वाहनांची वाहतूक सुरूच — अपघाताचा धोका वाढला!
निलेश भुवड श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी मो. 8149679123
श्रीवर्धन | श्रीवर्धन शहराबाहेरील वाळवटी मार्गावरील पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असूनही सध्या त्यावरून अवजड आणि अती अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेषतः जीवना जेटी परिसरात सुरू असलेल्या कामासाठी मोठमोठ्या दगडांची वाहतूक या पुलावरून केली जात असल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाला “धोकादायक” म्हणून फलक लावलेला असतानाही त्याकडे संबंधित विभाग आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, जर हा पूल कोसळला तर स्थानिकांसाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
नागरिकांनी प्रशासनाला तातडीने अवजड वाहनांची वाहतूक थांबवून पुलाची दुरुस्ती अथवा पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. सध्या या मागणीला स्थानिक पातळीवर जोर मिळत असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीची कारवाई करण्याचे आवाहन सर्व स्तरांतून होत आहे.