मामाच्या घरी जात असल्याचे सांगून निघाली आणि रात्री घरी परतली नाही; पहाटे तिचा मृतदेह आढळून आला

53

मामाच्या घरी जात असल्याचे सांगून निघाली आणि रात्री घरी परतली नाही; पहाटे तिचा मृतदेह आढळून आला

गुरुवारी रात्री आठच्यादरम्यान लगतच राहत असलेल्या मामाच्या घरी जात असल्याचे सांगून घरून निघाली आणि रात्री घरी परतली नाही. दरम्यान, आज सकाळी वांजरी शिवारातील बडवाईक यांच्या शेतातील बंड्याजवळ तिचा मृतदेह आढळून आला.

 यवतमाळ :- वणी पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेच्या डोक्‍यावर दगडाने प्रहार करून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी तालुक्‍यातील वांजरी शिवारात उघडकीस आली. या घटनेमुळे तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे.

जया मनोज आवारी वय 32, रा. पटवारी कॉलनी असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह वरोरा येथील मनोज आवारीसोबत झाला होता. मात्र, गेल्या सात वर्षांपासून पतीसोबत पटत नसल्याने ती विभक्त झाली होती. ती आपल्या दोन मुलांसह शहरातील पटवारी कॉलनी येथे भाड्याच्या घरात राहत होती.

गुरुवारी रात्री आठच्यादरम्यान लगतच राहत असलेल्या मामाच्या घरी जात असल्याचे सांगून घरून निघाली आणि रात्री घरी परतली नाही. दरम्यान, आज सकाळी वांजरी शिवारातील बडवाईक यांच्या शेतातील बंड्याजवळ तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांनी घटनास्थळ गाठले.

मृतदेह अनोळखी असल्याने तिची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, तिचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होताच अवघ्या एका तासात महिलेची ओळख पटली. दगडाने जोरदार प्रहार केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.