नागभीड लग्न मोडले म्हणून तरुणीसह आईचे अपहरण, आरोपीला मध्य प्रदेशाच्या सीमेवरून अटक.

नागपूर ग्रामीण पोलिसांनी रामकृष्ण भोयर नावाच्या तरुणाला अटक केली आहे. त्याच्याशी जुळलेले लग्न मुलीच्या घरच्यांनी मोडले होते. याचा राग आल्याने रामकृष्ण याने ज्या तरुणीशी त्याचे लग्न मोडले होते तिच्यासह तिच्या आईचेही अपहरण केले.

चंद्रपूर:- ही घटना नागभीड तालुक्यातील बहार्णी येथे मंगळवारी घडली होती. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने शर्थीचे प्रयत्न करून अपहृत महिलांची सुटका केली आणि आरोपीला अटक केली.

बहार्णी येथील तरुणीचे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील रुयाळ येथील रामकृष्ण भोयर या युवकाशी लग्न जुळले होते. काही दिवसांपूर्वी दोघांचा साक्षगंध झाला होता. मात्र, मुलाची वर्तवणूक चांगली नाही, अशी माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली, यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी लग्न तोडत असल्याचे तरुणाला आणि त्याच्या कुटुंबीयांना कळवले. मुलीच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे रामकृष्ण संतापला होता. संतापाच्या भरात त्याने तरुणीचे अपहरण करण्याचा कट रचला. त्याने त्याच्या या कटामध्ये त्याच्या 5 मित्रांनाही सहभागी करून घेतले.

मंगळवारी रामकृष्ण भोयर व त्याचे मित्र वाहनासह मुलीच्या गावात पोहोचले. रामकृष्ण आणि त्याच्या एका मित्राने मुलीच्या घरात प्रवेश केला आणि तिला बळजबरी उचलून गाडीत टाकले. हा प्रकार पाहून तरुणीच्या आईने आरडाओरडा करायला सुरुवात केली. यामुळे रामकृष्ण याने तरुणीच्या आईलाही बळजबरीने गाडीत बसवत पळ काढला. कान्पा येथे आरोपीने दुसरे वाहन उभे करून ठेवले होते. या वाहनातून रामकृष्ण हा युवती आणि तिच्या आईला घेऊन मध्यप्रदेशच्या दिशेने पसार झाला. रामकृष्णचे साथीदार हे दुसऱ्या वाहनातून पसार झाले.

मुलीच्या अपहरणाची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळताच त्यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना माहिती दिली. त्यांनी लगेच नागपूर ग्रामीण पोलिसांना माहिती देत चंद्रपूसह नागपूर जिल्ह्याच्या मध्यप्रदेश सीमेवर नाकाबंदी केली. केळवद पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी करून पोलिसांनी आरोपीचे वाहन अडविले. आरोपी रामकृष्ण भोयरसह त्याचे अन्य दोन मित्रांना अटक करून युवती आणि तिच्या आईची सुटका करण्यात आली. नागभीड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपहरणासाठी वापरण्यात आलेली दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. रामकृष्ण भोयरसह शुभम गोडबोले, शेषराज गडेकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य आरोपी पसार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिली. पुढील तपासासाठी प्रकरण नागभीड पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here