धनंजय मुंडेना  बलात्कार प्रकरण भोवणार?. मुख्यमंत्री कारवाई करणार?

प्रशांत जगताप

मुंबई:- भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचा बीडमधील ढाण्या वाघ म्हणून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा लौकीक आहे. सध्या तरी बीड आणि धनंजय मुंडे असंच समीकरण पाहायला मिळत आहे. संघर्ष, अमोघ वक्तृत्व आणि कुशल संघटन कौशल्याच्या बळावर धनंजय यांनी राजकारणात स्वत:ची स्पेस निर्माण केली आहे. त्यांच्या राजकारणाला आता कुठे खऱ्या अर्थाने बहर आलेला असतानाच त्यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. या निमित्ताने धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्दपणाला लागली असून त्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

गायिका रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. मुंडे यांनी त्यावर फेसबुकवरून उत्तरही दिलं आहे. शर्मा यांनी मात्र मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केल्याचं म्हटलं आहे.

शर्मा यांच्या या आरोपामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. मुंडे 1995 पासून राजकारणात आहेत. या आरोपांमुळे त्यांच्या 25 वर्षाच्या राजकारणाला ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकारणात अनेक चढउतार पाहिल्यानंतर एवढा मोठा आरोप झाल्याने मुंडेंच्या राजकारणाचं काय होणार? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मुख्यमंत्री कारवाई करणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत शालीन आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते मुंडेवर कारवाई करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंडे आणि ठाकरे घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंवर कारवाई करताना मुख्यमंत्र्यांना हे संबंध आडवे येतील का? या बाबत अनके तर्कवितर्क लगावले जात आहेत. शिवाय धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. उद्या मुंडेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची वेळ आली तर पवार त्याला संमती देतील का? याबाबत काहीही सांगता येत नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

इतके दिवस गप्प का?

रेणू शर्मा यांनी मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला आहे. 2006 पासून मुंडे यांनी आपलं शारीरिक शोषण केल्याचं रेणू यांनी म्हटलं आहे. 2006 पासून हा प्रकार सुरू होता तर गेली 14 वर्ष त्या गप्प का होत्या? आताच त्यांनी हे बिंग का फोडलं? यामागे काही कारणं आहेत का? असे प्रश्नही या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे 2006 मधील प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याबाबत अनेक तर्क लढवले जात आहेत.

तरीही कारकिर्दीला घरघर लागणार?

मुंडे यांच्यावर सरकारने कारवाई केली नाही किंवा त्यांचा पक्षाकडून बचाव करण्यात आला तरी मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला घरघर लागू शकते, असं जाणकार सांगतात. प्रत्येक निवडणुकीत मतदारांसमोर जाताना हे प्रकरण चर्चिले जाईल आणि विरोधकांकडून त्याचा हत्यार म्हणून वापर केला जाईल. त्यामुळे मानहानीला सामोरे जायचं की राजकारणात राह्यचं या दोन पर्यांयापैकी एका पर्यायाचा मुंडे यांना स्वीकार करावा लागेल, असं जाणकार सांगत आहेत.

असा घडला प्रवास

1995 च्या विधानसभा निवडणुकीपासून काका गोपीनाथ मुंडे यांचा हात पकडून धनंजय मुंडे राजकारणात आले. सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यांनी बेरोजगारांच्या सभा, मोर्चे काढून रान उठवलं होतं. 9 ऑगस्ट 2008 रोजी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिल्ली येथे झालेल्या युवा क्रांती रॅलीत 15 हजार युवकांचे नेतृत्व त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी मार्च 2009मध्ये युवकांच्या प्रश्नांसंदर्भात पुणे येथे राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करून युवकांच्या हक्काची सनद प्रसिद्ध केली. जून 2010 मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची प्रथम निवड झाली. मात्र, सतत राजकीय उपेक्षा वाट्याला आल्याने त्यांनी अखेर 2011मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून 2013मध्ये विधानपरिषदेवर गेले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सभागृह गाजवलं. त्यांच्या वक्तृत्वाने त्यांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं. त्यानंतर ते 2019 मध्ये विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर त्यांच्याकडे सामाजिक न्यायमंत्रीपदाची सूत्रे सोपवण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here