सौंदर्याची खाण, बॉलिवूडची शान: मधुबाला
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो ९९२२५४६२९५
आज १४ फेब्रुवारी, बॉलिवूडची मरलीन मनरो, सौंदर्याची खाण, बॉलिवूडची शान, चित्रपट सृष्टीतीलच नव्हे तर भारतातील सर्वात सुंदर महिला असे जीचे वर्णन केले जाते त्या मधुबाला यांचा आज जन्मदिन. आज त्यांची ९० वि जयंती. १४ फेब्रुवारी १९३३ रोजी दिल्लीच्या एका पश्तून कुटुंबात जन्मलेल्या मधुबाला यांचे मूळ नाव मुमताज बेगम जहाँ देहलवी.
असे म्हणतात की मधुबाला यांच्या जन्मानंतर एका व्यक्तीने तिच्या बाबत असे भविष्य वर्तवले होते की ती तिच्या आयुष्यात खूप ख्याती मिळवेल. पैसा अडका, धन संपत्ती मिळवेल पण तिचे आयुष्य अतिशय दुःखी असेल. या भविष्यावर विश्वास ठेवून तिचे वडील तिला मुंबईला घेऊन आले. वयाच्या नवव्या वर्षी म्हणजे १९४२ साली मधुबाला यांनी बेबी मुमताज या नावाने चित्रपटात भूमिका करण्यास सुरुवात केली. बाबुराव पटेल आणि डॉ सुशीलाराणी पटेल या दाम्पत्याचा मधुबाला वर विशेष लोभ होता त्यांनीच तिला मधुबाला हे नाव दिले.
बालवयातच चित्रपटात काम करू लागल्याने मधुबाला या शाळेत जाऊ शकल्या नाहीत त्यामुळे त्यांना इंग्रजी येत नसे मात्र उर्दू भाषा येत होती. चित्रपटात भूमिका करण्यास सुरवात केल्यावर मात्र तिने इंग्रजीवर चांगले प्रभुत्व मिळवले. तिचे वडील कडक शिस्तीचे असल्याने ती कधीही चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहत नसे. १९४७ सालीं आलेल्या निलकमल या चित्रपटात ती पहिल्यांदा अभिनेत्री म्हणून झळकली. याच वर्षी तिचा आणखी एक चित्रपट रिलीज झाला. पुढच्या वर्षी म्हणजे १९४८ साली तिचा अमर प्रेम नावाचा चित्रपट आला या सर्व चित्रपटात राज कपूर हे तिचे नायक होते. यानंतर बॉम्बे टॉकीजचा महल नावाचा चित्रपट आला हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. यानंतर मात्र मधुबाला यांनी मागे वळून पाहिले नाही.
अशोक कुमार, दिलीपकुमार, देवानंद या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांसह तिने भूमिका केल्या. अल्पावधीतच त्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री बनल्या. त्यांनी आपल्या करियरमध्ये ६६ चित्रपटात भूमिका केल्या. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिलीपकुमार यांच्यावर त्या एकतर्फी प्रेम करत असत. मुघले आझम चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान त्यांनी दिलीपकुमार यांच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली मात्र दिलीपकुमार यांनी लग्नास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर त्यांनी गायक किशोरकुमार यांच्याशी विवाह केला.”
मधुबाला या किशोरकुमार यांच्या चौथ्या पत्नी होत्या. किशोरकुमार यांच्या बरोबरचे लग्न ही बाब दोघांसाठी कसेतरी जगण्यासाठी केलेली तडजोड होती त्यामुळेच दोघांचे जास्त पटत नसे. मधुबाला यांना हृदय रोग होता आणि १९५० पासून त्यांच्यावर उपचार चालू होते. पण तिने ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती. तिची तब्येत बरी नसतानाही त्यांनी निर्माते दिग्दर्शकांचे नुकसान होऊ नये म्हणून साइन केलेले चित्रपट पूर्ण केले. या चित्रपटात असे कोठेही जाणवत नव्हते की त्या आजारी आहेत.
हृदय रोगासोबत त्यांना असा एक आजार होता की ज्या आजाराने शरीरात प्रमाणापेक्षा अधिक रक्त तयार होत असे व तिच्या नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव होत असे. इतक्या दुर्धर आजारातही तिने चित्रपटात काम करणे सुरूच ठेवले. मुघले आझम या चित्रपटातील एका दृश्यात तिला दोरखंडाने बांधले होते पण तिने तब्येत बरी नसतानाही ते सहन केले. ती म्हणायची अनारकलीची भूमिका करण्याची संधी पुन्हा मिळणार नाही. ती इतकी प्रोफेशनल होती की आपले काम अतिशय तन्मयतेने करत असत. प्रसंगी जेवण झाले नाही तरी चालेल, थर्ड क्लासने प्रवास करावा लागला तरी चालेल पण काम वेळेच्या वेळी पूर्ण करण्याचा तिचा आग्रह असे. तिच्या याच कामाच्या निष्ठेमुळे ती महान अभिनेत्री बनली.
अमेरिकेच्या थिएटर आर्टस या जगप्रसिद्ध मासिकेने तिचा जगातील सर्वात मोठी अभिनेत्री म्हणून गौरव केला होता. तिच्या सौंदर्याची जादूच अशी होती की बघणारा हरखून जायचा. पण हेच आरस्पानी सौंदर्य तिच्यासाठी मात्र शापित ठरले. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. २३ फेब्रुवारी १९६९ साली त्यांनी जगाचा निरोप घेतला. मधुबालाला व्हीनस ऑफ स्क्रीन असे म्हटले जाते मात्र तिच्या याच आरस्पानी सौंदर्याला अल्पायुष्याचा शाप होता.
आज त्या जाऊन ५४ वर्ष झाले मात्र त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची जादू आजही कायम आहे. सौंदर्याची खाण बॉलिवूडची शान असलेल्या मधुबाला यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!