अटीतटीच्या अंतिम सामन्यात “नवयुवक धाटाव” संघ विजयी; “आमदार चषक २०२४” रोह्यातील खेळाडूंनी जिंकली माणगांवकरांची मनं.

53

अटीतटीच्या अंतिम सामन्यात “नवयुवक धाटाव” संघ विजयी; “आमदार चषक २०२४” रोह्यातील खेळाडूंनी जिंकली माणगांवकरांची मनं.

अटीतटीच्या अंतिम सामन्यात "नवयुवक धाटाव" संघ विजयी; "आमदार चषक २०२४" रोह्यातील खेळाडूंनी जिंकली माणगांवकरांची मनं.

नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048

माणगाव : अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठान तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त १० फेब्रुवारीला तालुकास्तरीय व ११ फेब्रुवारीला जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत नवयुवक धाटाव रोहा संघाने चुरशीच्या लढतीत कडसुरे चोंडेश्वरी संघाचा पराभव करत विजेतेपदाचा चषक उंचावत प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळविला. नवयुवक धाटाव संघाच्याच अजय मोरे याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

अशोकदादा साबळे महाविद्यालयाच्या पटांगणात झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात नवयुवक धाटाव विरुद्ध कडसुरे चोंडेश्वरी अशी अंतिम लढत झाली. हा अंतिम सामना १६-१६ असे समान गुणसंख्या झाल्याने टाय झाला, दोन्ही संघांना ५ रेड देण्यात आल्या. यावेळी नवतरुण धाटाव संघाने अतिशय रोमहर्षक अटीतटीच्या या लढतीत अवघ्या एक गुणाने विजय संपादन केला.

प्रथम क्रमांक मिळविलेल्या नवयुवक धाटाव संघाला ५१ हजार रुपये तसेच चषक देऊन गौरवण्यात आले. उपविजेत्या कडसुरे चोंडेश्वरी संघाला ३१ हजार रुपयांसह चषक देण्यात आले. तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या नवतरुण धाटाव संघाला २१ हजार रुपये व चषक आणि चतुर्थ क्रमांकावर असलेल्या जय बजरंग रोहा संघाला ११ हजार रुपये आणि चषक देण्यात आले. जय बजरंग रोहा संघाच्या राज मोरे याला उत्कृष्ट पकडपटू म्हणून निवडून त्याला ३००० रुपये व चषक देऊन सन्मान करण्यात आला तर कडसुरे संघाचा निखिल शिर्के याला उत्कृष्ट चढाईपटू म्हणून निवड करून ३००० रुपये व चषक देऊन सन्मान करण्यात आला.

अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक राजीव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी रायगड जिल्हा कबड्डी अससिएशनच्या माध्यमातून एक चांगल्या कबड्डीच्या मर्दानी खेळांची मेजवानी माणगांवकरांसाठी उपलब्ध केली. माणगांवकरांनी देखील २ दिवस तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचा मनसोक्त आनंद घेतला. प्रतिष्ठान तर्फे ठेवण्यात आलेल्या “आमदार चषक २०२४” स्पर्धेत रोह्यातील खेळाडूंनी आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करत माणगांवकरांची मन जिंकली.