टाटा मोटर्स व बी. व्ही. जी. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने नवीन “रस्ते सुरक्षा ॲप्लिकेशन वापरासाठी सज्ज….

टाटा मोटर्स व बी. व्ही. जी. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने नवीन “रस्ते सुरक्षा ॲप्लिकेशन वापरासाठी सज्ज….
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग :- टाटा मोटर्स व बी. व्ही. जी. फाउंडेशन यांनी एकत्रितपणे रस्ते सुरक्षा वाढीच्या दृष्टिकोनातून नवीन अँप्लिकेशन तयार केले आहे. या अँप्लिकेशनला “गुड समॅरिटन रस्ता सुरक्षा अँप” असे नाव देण्यात आले आहे.
उच्च तंत्रज्ञान व सामान्य जनतेकडून केली जाणारी अपघात प्रसंगी कृती यांच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा व आपत्कालीन परिस्थितीमध्ये दिली जाणारी मदत वाढविणे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
रस्ते अपघातातील जखमींपर्यंत कमीत कमी वेळेमध्ये वैद्यकीय मदत पोहचण्यासाठी सध्याच्या १०८ रुग्णवाहिका पाठविण्याच्या कार्य प्रणालीमध्ये याअँप्लिकेशनचा सुयोग्य वापर करण्यात आला आहे.
गुड समॅरिटन म्हणजे काय?…
सद्भावनेने प्रेरित होऊन अपघात किंवा एखाद्या दुर्घटनेतील जखमी व्यक्तीला मदत करणारा आपत्ती सेवक जे राज्य सरकार व काही एनजीओ तयार करीत आहेत. भारतात रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. अशातच कायदेशीर कटकटींना घाबरून लोक मदतीस पुढे येत नाहीत व त्यामुळे वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे सन २०१६ मध्ये गुड समॅरिटन कायदा लागू करण्यात आला, त्यामुळे सामान्य लोकांना प्राथमिक उपचारामध्ये बाधा न आणता मदत करणार्यास कायद्याचे संरक्षण मिळाले.
१३ मार्च, राष्ट्रीय गुड समॅरिटन दिवस म्हणून साजरा केला जातो.
यादिवसाचे औचित्य साधून जास्तीत जास्त लोकांमध्ये अपघात ग्रस्तांना मदत करण्याची स‌द्भावना जागृत करणे, प्राथमिक उपचार करणे, त्यांची काळजी घेणे तसेच या अँप्लिकेशनचा वापर करण्या संदर्भात जनजागृती अभियान बी.व्ही. जी. फाउंडेशन यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. तसेच पूर्ण राज्यभरामध्ये 27 ठिकाणी समेरिटन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या आहेत, यामध्ये अंदाजे 1500 लोकांना याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. अशा कार्यशाळेमध्ये अपघात प्रसंगी मदत करणाऱ्या युवक युतीने सहभागी होऊन प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन बीव्हीजी चे मुख्य संचालक हनुमंतराव गायकवाड यांनी केले आहे.