चिचपल्ली येथे अंधारी नदीवर मोठया उंच पुलाचे बांधकाम; मुल राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम मंजूर करावे आ. मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी.

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपुर
मो 9764268694
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्यामध्ये औद्योगिकदृष्टया महत्वपूर्ण व आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्हयाच्या दळणवळण विषयक समस्येवर उपाययोजना तसेच वाहतुकीच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोणातुन चंद्रपूर – मुल या राष्ट्रीय महामार्गावर चिचपल्ली येथील अंधारी नदीवर मोठया उंच पुलाचे त्याचप्रमाणे मुल येथील अस्तित्वातील राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम मंजूर करावे अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व राजमार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
नुकतेच मुल शहरात राष्ट्रीय महामार्ग ९३० अंतर्गत बायपास रोडचे बांधकाम अर्थात वळण मार्गाचे बांधकाम रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासह मंजूर करण्यात आले आहे. यासाठी रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या दिनांक २२ जून २०२१ च्या मंजूर वार्षीक नियोजनाअंतर्गत ७५ कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला आहे.आता मुल शहरातील अस्तित्वातील राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे उड्डाणपूल बांधण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.ना. नितीन गडकरी यांनी अंधारी नदीवरील मोठया उंच पुलाचे बांधकाम व मुल येथील अस्तित्वातील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाला तात्काळ मंजूरी देवून निधी उपलब्ध करून चंद्रपूर जिल्हयाच्या विकासात भर घालावी अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला ना. नितीनजींनी नेहमीच प्राधान्य दिले आहे , या दोन्ही पुलांच्या बांधकामाला ते प्राधान्याने मंजुरी देतील असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.