विज अंगावर कोसळल्याने आईचा मृत्यू मुलगा गंभीर जखमी

प्रा.अक्षय पेटकर
ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी वर्धा
टाकळी (निधा) येथील घटना
आजनसरा पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या टाकळी (निधा) येथील शेतकरी मायलेकांच्या अंगावर विज कोसळल्याने शेतकरी महिला जागीच ठार झाली असून, मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना 12 जुलै रोजी घडली आहे, टाकळी येथील मायलेक सुशीला ज्ञानेश्वर जवंजाळ वय 50 वर्ष व गणेश ज्ञानेश्वर जवंजाळ वय 26 वर्षे यांचे टाकळी येथील सावंगी रिठ शिवारात शेत असून शेतात पराटी व तुरीच्या पिकाची लागवड करण्यात आली आहे, आज 12 जुलै ला सुशीला व गणेश हे दोन्ही मायलेक शेतात निंदन व डवरणी करण्यासाठी गेले होते, दुपारी दोन वाजता चे सुमारास न्याहारी करून पाणी पित असतानाच, विजांचा जोरजोरात कडकडाट सुरू झाला व या मायलेकांचा अंगावर वीज कोसळल्याने सुशिला ज्ञानेश्वर जवंजाळ यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गणेश गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कस्तुरबा गांधी रुग्णालय सेवाग्राम येथे पाठविण्यात आले आहे,
सदर घटनेची माहिती टाकळीचे पोलीस पाटील कांतेश्वर(राजू) लोंढे यांना मिळताच त्यांनी वडणेर पोलिसांना माहिती देण्यात आली, घटनास्थळाचा पंचनामा करून मृतक शेतकरी महिला सुशीला जवंजाळ यांचे वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, आजच अंतिम संस्कार करण्यात येणार आहे, गणेश यांच्या वडिलांचे सुद्धा गेल्या वर्षीच निधन झाले आहे, व आज मातृछत्र सुद्धा हरवल्या गेले असल्याने गणेश मात्र पोरका झाला आहे,सुशीलाबाई यांच्या अकस्मात मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे,
शासनाकडून ताबडतोब आर्थिक मदत देण्याची मागणी टाकळीवासीयांकडून करण्यात येत आहे.