सरंजामी मानसिकतेतून घृणास्पद कृत्य…

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही देशातील काही लोकांची सरंजामी मानसिकता कमी होताना दिसत नाही. विशेषतः देशातील उत्तर भारतात म्हणजे उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, हरियाणा या राज्यातील दबंग नेत्यांमध्ये अजूनही ही सरंजामी मानसिकता दिसून येते त्याचा प्रत्यय नुकताच आला. मध्यप्रदेश राज्यातील सिद्धी जिल्ह्यात एका आदिवासी तरुणाच्या तोंडावर एका भाजप नेत्याने लघुशंका केली. भाजप नेत्याच्या या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून तळपायाची आग मस्तकात गेली.

हा व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. विरोधी पक्षांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. हे प्रकरण भाजपवर शेकू शकते हे लक्षात येताच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी त्या आदिवासी तरुणाची भेट घेतली. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी या पीडित आदिवासी तरुणाला आपल्या घरी बोलावून त्याचा सन्मान केला, तसेच झाल्या प्रकाराबाबत या तरुणाची माफी मागितली इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांनी या पीडित आदिवासी तरुणाचे पाय धुतले आणि त्याचा शाल श्रीफळ देऊन सन्माम केला. पीडित तरुणाचे पाय धुऊन शिवराजसिंग चौहान यांनी आपल्या पक्षाच्या नेत्याने केलेल्या पापाचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला असला तरी मुख्यमंत्र्यांनी हे का केले हे न समजण्याइतकी जनता दुधकखुळी नाही. मुख्यमंत्र्यांनी पीडित तरुणाला घरी बोलावून झालेल्या घृणास्पद प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला कारण मुख्यमंत्र्यांना चिंता आहे ती आगामी निवडणुकीची.

मध्यप्रदेशात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. जर हे प्रकरण मिटवले नाही आणि विरोधी पक्षांनी वातावरण तापवले तर त्याचा परिणाम निवडणुकीत होऊ शकतो हे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान जाणून आहेत कारण मध्यप्रदेशात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. आदिवासींसाठी ४७ जागा राखीव आहेत. त्यांचे १.२५ कोटी मतदार आहेत. इतर ५४ मतदार संघात आदिवासींचे मतदार १० ते ३९ टक्के इतके आहे म्हणजेच १०१ मतदार संघात आदिवासींची ताकद आहे. जर हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळले नाही तर या १०१ मतदार संघावर परिणाम होऊ शकतो त्यामुळेच मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी या पीडित आदिवासी तरुणाचे पाय धुऊन आपल्या नेत्याने केलेल्या पापाचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र असे करून आपण सरंजामी मानसिकता असलेल्या जातीयवादी दबंग लोकांना पाठीशी घालत आहोत याचाही विचार मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. अर्थात सरंजामी मानसिकतेतून दलित आदिवासींवर अन्याय अत्याचार होण्याची ही पहिलीच घटना नाही.

देशाच्या उत्तर भारतात तर असे प्रकार नेहमीच घडत असतात. नवरदेव घोड्यावर बसल्याने त्याला मारहाण करणे, मंदिरात दलितांनी प्रवेश केला तर त्याला विरोध करणे, वरातीत नाचल्याने तरुणाला मारहाण करणे असे प्रकार उत्तर भारतात नेहमीच घडत असतात. गावातील दबंग व्यक्तीच्या बरोबरीने दलित व्यक्ती बसू शकत नाही त्याने त्या दबंग व्यक्तीच्या समोरच हात जोडून उभे राहिले पाहिजे असाही दंडक काही गावात आजही आहे. मुळात ही सरंजामी मानसिकता जोवर जात नाही तोवर अशा घटना घडतच राहणार आहेत केवळ पीडितांचे पाय धुऊन हे प्रकार थांबणार नाहीत तर अशी सरंजामी मानसिकता असणाऱ्या दबंग लोकांना कठोर शासन करण्याचे धारिष्ट्यही मुख्यमंत्र्यांनी दाखवायला हवे. जेंव्हा अशा दबंग नेत्यांना कायद्याने कठोर शिक्षा होईल तेंव्हाच अशा प्रकाराला आळा बसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here