स्वानंद मृदुंग क्लासेस शिष्यगण आयोजित “गुरूपौर्णिमा उत्सव” उत्साहात व भक्तिभावात संपन्न

स्वानंद मृदुंग क्लासेस शिष्यगण आयोजित “गुरूपौर्णिमा उत्सव” उत्साहात व भक्तिभावात संपन्न

गुरुवर्य ह.भ.प. सुनील भाऊ मेस्त्री यांचा शिष्यगणातर्फे सन्मान व संगीतभक्तीमय कार्यक्रम

सिध्देश पवार
तालुका प्रतिनिधी
8482851562

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील ख्यातनाम मृदुंगाचार्य आणि दुबई येथे मृदुंगसेवेच्या माध्यमातून शेकडो शिष्य घडवणारे आदरणीय ह.भ.प. सुनील भाऊ मेस्त्री यांच्या सन्मानार्थ “गुरूपौर्णिमा उत्सव” अत्यंत भक्तिपूर्ण व स्नेहपूर्ण वातावरणात कॅप्टन विक्रम हॉल, पोलादपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन, मृदुंग पूजन तसेच वै. पं. रामदादा मेस्त्री आणि वै. पं. शंकर मेस्त्री सर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यानंतर गुरूंच्या चरणी पाद्यपूजन करत, भावपूर्ण व साश्रुनयनांनी शिष्यगणांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यानंतर झालेला संगीतभक्तिमय भजनांचा कार्यक्रम कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण ठरला. उस्ताद रशीद खान यांचे शिष्य ह.भ.प. ओम दादा बोगणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध भजन, गायन, आणि मृदुंग वादन सादर झाले. महाड, पोलादपूर, माणगाव, मंडणगड आदी भागांतून आलेले नामवंत कलाकार सहभागी झाले होते.

या सोहळ्यास पोलादपूर तालुका भाजप अध्यक्ष श्री. वैभव चांदे, तसेच विविध राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन, शिस्तबद्धता आणि भक्तीभाव यांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

गुरुवर्य ह.भ.प. सुनील भाऊ मेस्त्री यांनी आपल्या मनोगतात शिष्यगणाला मृदुंगाचे सांस्कृतिक, आध्यात्मिक महत्त्व उलगडून सांगितले. “मृदुंग हे केवळ वाद्य नाही, तर भक्तीचा प्राण आहे. वारकरी संप्रदायातील हे साधन अंतःकरणातून वाजवले की, ते साधन न राहता साधना बनते,” असे ते म्हणाले.

तसेच त्यांनी ‘स्वानंद मृदुंग क्लासेस’च्या पोलादपूर, महाड व डोंबिवली येथील शाखांमधून सुरू असलेल्या प्रशिक्षणाविषयी माहिती दिली. “मृदुंग शिकण्याची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी या केंद्रांशी संपर्क साधावा, जेणेकरून अधिक गुणी व समर्पित कलाकार घडवता येतील,” असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबई, पुणे, रायगड जिल्ह्यातून आलेल्या शेकडो शिष्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या गुरूपौर्णिमा सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तीमय केला. कार्यक्रमाची सांगता सामूहिक आरती व गुरुवंदनाने करण्यात आली.