भारतीय जनतेचा लक्षवेधी टाहो, माझा प्यारा तिरंगा; का करता बेरंगा?

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे

 मो. न: ७४१४९८३३३९

१३ ऑगस्ट, गडचिरोली

संपूर्ण भारतदेशाची जनता आजपासून सलग तीन दिवस देशभक्ती व देशप्रेमाच्या मस्तीत चूर होऊन जाणार आहे. या मस्तीच्या धुंदीत राष्ट्रध्वज कसा फडकविला? व त्याची दुर्दशा कशी झाली? याचे यत्किंचितही भान कोणालाच असणार नाही. क्रांती, शौर्य, शांती, धैर्य, त्याग, समृद्धी आदींचे प्रतिक असलेला राष्ट्रीय ध्वज माझा प्यारा तिरंगा सतत तीन दिवस बेइज्जत होऊन हिरमुसलेला असेल. सत्ताधिशांच्या आदेशाने प्रजेनेच त्याची लक्तरे फाडून त्यास नंगा केले आहे, नागविले आहे. तर मग गाऱ्हाणे सांगावे, तर कुणाला? आजवर ७५ वर्षापर्यंत त्याला मोठ्या हिपाजतीने सांभाळण्यात आले. देश हाच माझा देव या पवित्र भावनेने त्याच्या तिरंगा- राष्ट्रध्वजाची आण, बाण, शान व मान उंचावून धरली होती. ती आजतागायत कधीच मातीमोल होऊ दिलेली नव्हती. मात्र, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात “हर घर तिरंगा; घर घर तिरंगा” अर्थात घरोघरी तिरंगा या अतिशयोक्तीपूर्ण उपक्रमात जनतेच्या बेपर्वा आनंदोत्सवाने त्याच्या अब्रूवरच घाला घातला. प्रत्येक जण त्याच्या अब्रूची लक्तरे वेशींवर, घरपरिसरात किंवा दरवाजांवर टांगण्यास उसण्या मिजासीने एका पायावर तयार झाला आहे. कुणीतरी वाटप करत करत आणून दिलेला माझा प्यारा तिरंगा हौशी जनता उकलून बघते तर काय? तो बेरूप झालेला दृष्टीस पडला. तेव्हा जनतेने एकच हलकल्लोळ केला, कि अपमानीत केलेला बेढब असाच राष्ट्रध्वज आपल्या घरी फडकवावा की काय? हा एकंदरीत आनंदोत्सव नसून त्याला हिणवत त्याच्या समक्ष केलेला हा नंगा नाच आहे. या उपक्रमाच्या प्रचार-प्रसाराच्या बातम्या व जाहीराती ऐकून मनातल्या मनात चरफडणारी निरपराध जनता आता बिनबोभाटपणे हाक देत आहे, की बंद करा, ही उपक्रमाची प्रिती; ज्याने होय ध्वजाची बेइज्जती!

कालपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील शहरात व खेडोपाडी घरोघरी जाऊन मोफत राष्ट्रध्वज तिरंगा वाटप करण्यात आला. कारण भारतदेश स्वातंत्र्याची ७५ वर्षेपूर्ती ही “आजादी का अमृत महोत्सव” या अभियानांतर्गत आज दि.१३ ते १५ ऑगस्ट- स्वातंत्र्य दिनापर्यंत घरोघरी तिरंगा फडकविणे, हा उपक्रम जल्लोषात साजरा करणार आहे. त्याची ही प्रत्येक घरास झेंडे वाटपाची पूर्वतयारी होती. वाटपकर्त्या लोकांनी कसेबसे गुंडाळलेले ध्वज प्रत्येक घरी देऊन आपल्या रजिस्टरवर घरमालकाचे नाव नोंदवले. लोक ध्वजाची गुंडाळी उकलून पाहिली. राष्ट्रध्वज सरळ करून पाहिला, तर काय? तो माझा प्यारा तिरंगा चिरमटलेल्या अवस्थेत, त्याची लांबी-रुंदी बिघडलेली, तिरकस आकार, शिलाई वेडीवाकडी, अशोकचक्र मधोमध न येता वन साईडला सरकलेला, तीनही रंगाच्या पट्ट्यांची रूंदी कमीजास्त अशी बेरूप व कुरूप अवस्था पाहून सर्वत्र एकच आक्रोश मचला. सुंदर व आकर्षक दिसणारा तो ध्वज आपला राष्ट्रीय ध्वजच आहे, असे कोणालाच वाटत नव्हते. असा बेढब झालेला माझा प्यारा तिरंगा ध्वज आपण कधीच पाहिले नाही व असा त्याचा अपमान सहन केल्याचे आठवतही नाही, अशी कुजबूज सुरू झाली. असेच ध्वज आपण आपल्या घरी फडकवावे का? राष्ट्रध्वजाची अवमानना व अवहेलना केल्याप्रकरणी आम्ही तुरूंगात खडी फोडण्यास जावे का? राष्ट्रध्वज संहितेचे आम्ही पालन न करणारे देशद्रोही ठरावे? अशा अनेकानेक प्रश्नांनी जनमानसात काहूर माजविले आहे. गडचिरोली जिल्ह्यासारखेच इतरही ठिकाणी अशाच बेइज्जत ध्वजाचे वितरण का झाले नसावे? सर्वत्र अशी एकसारखीच बोंबाबोंब असेल, असे वाटू लागले आहे. एकच किंकाळी सगळी घुमू लागली आहे, “रोका राष्ट्रध्वजाचा अपमान; का त्याची हो मातीमोल शान?”

आबाल वृद्धांच्या हातून फडकता ध्वज खाली पडणे, फाटणे, कचऱ्याच्या ढिगावर फेकून देणे, पायदळी तुडवला जाणे, अशा किती तरी चुका कळत न कळत होतील, अशी भिती नागरिकांत संचरली आहे. खरे प्रत्यक्षात उपक्रमाचे दिवस पुढे शिल्लक आहेत. त्या दिवसांत तरी माझा प्राणप्यारा तिरंगा आणखी नागविला जाऊ नये. म्हणून भारताचे सूज्ञ नागरिक टाहो फोडून सांगत आहेत, थांबवा हो थांबवा, नाच हा नंगा; नको घरोघरी तिरंगा! प्रजेचा हा आकांत खरेच सुजाण नागरिकांची मौजमस्तीची वायफळ धुंदी उतरविणारा नक्कीच आहे, मात्र हे समजून घेण्यासाठी फार मोठे काळीज आहे तरी का कोणाजवळ?

!! विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उँचा रहे हमारा !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here