सुंदरराव मोरे महाविद्यालयात हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता उपक्रम
स्वच्छता रॅली, प्रतिज्ञा, श्रमदान आदी उपक्रमांचे आयोजन
सिध्देश पवार
तालुका प्रतिनिधी पोलादपूर
848285153
पोलादपूर, दिनांक १२ ऑगस्ट २५ – शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व आजीवन अध्ययन विभागाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता ! स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग ! या मुख्य संकल्पनेवर आधारित स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. भारत सरकारच्या जलशक्ती आणि सांस्कृतिक मंत्रालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार तसेच रायगड जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभागाने केलेल्या मार्गदर्शनाखाली सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिनांक ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत स्वच्छता अभियान मोहीम आयोजित केली आहे. या मोहिमे अंतर्गत आज विद्यार्थ्यांनी स्वच्छ आणि सुजल गावा संदर्भात प्रतिज्ञा घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा सुनील बलखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेले येत असलेल्या या स्वच्छता अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसर, तसेच चोळई गावचा परिसर आदी भागातून स्वच्छता रॅलीचे आयोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छता हीच सेवा ! आजची स्वच्छता उद्याची समृद्धी ! अशा घोषणा दिल्या. त्याचप्रमाणे या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयीन क्रीडांगणाची साफसफाई, महाविद्यालयातील पाण्याच्या टाक्या, अन्य परिसर यांची स्वच्छता विद्यार्थ्यांनी हाती घेतली. स्वच्छता अभियान मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेबाबतची आव्हाने आणि उपाय योजना या विषयावरील निबंध स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अधिकारी डॉ राम बरकुले यांनी दिली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापन, भूजल संवर्धन याबाबतीत देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सांगता स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य समारंभामध्ये होणार आहे. सदर अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.राम बरकुले डॉ शैलेश जाधव, प्रा स्नेहल कांबळे, प्रा. संजय कसबे प्रयत्नशील आहेत.