रायगड जिल्ह्यामध्ये आठ हजार 979 दहीहंड्या उभारण्यात येणार
सलोखा राखीत उत्सव साजरा करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्ह्यामध्ये येत्या शनिवारी (दि.16) दहीहंडीचा उत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्यामध्ये आठ हजार 979 दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. यानिमित्ताने जिल्ह्यात 355 ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. हा उत्सव जातीय सलोखा राखत, आनंदमय वातावरणात साजरा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
जिल्हा शांतता कमिटीची बैठक मंगळवारी (दि.12) जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की दहीहंडीचा उत्सव जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याची तयारी आयोजकांमार्फत सुरु झाली आहे. पुरुष गोविंदा पथकांसह महिला गोविंदा पथकांचादेखील समावेश दहीहंडी उत्सवामध्ये असणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. दहीहंडी उत्सव साजरा होण्याच्या ठिकाणी मुबलक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पाहणी करावी. उत्सव साजरा होत असताना कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने जिल्ह्यात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामध्ये 150 पोलीस अधिकारी, 950 पोलीस कर्मचारी, 350 होमगार्ड, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून 73 वाहतूक पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी या कालावधीत असणार आहे.
दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने जिल्ह्यात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामध्ये 150 पोलीस अधिकारी, 950 पोलीस कर्मचारी, 350 होमगार्ड, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून 73 वाहतूक पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी या कालावधीत असणार आहे.
सण-उत्सव साजरे होत असताना विजेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी महावितरण कंपनीने घेतली पाहिजे. मिरवणुकीचे मार्ग सुरळीत व चांगले असणे आवश्यक आहे. त्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.
किशन जावळे, जिल्हाधिकारी