संघर्ष करणाऱ्यांशी जुळवून घेण्याची प्रस्थापितांवर वेळ
रायगडातील राजकीय पक्ष झाले परस्परांचे विरोधक: मित्र झाले विरोधक
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: कोणीही कायमस्वरूपी विरोधक नसतो,वा जवळ वाटणारा कायमचा मित्रही होत नसतो. कधीना कधी वैचारिक मतभेद बाजूला ठेवत सत्तेचा प्रवाहात राहण्यासाठी रायगडच्या प्रस्थापितांना संघर्ष करणाऱ्यांशी जुळवून घेण्याची वेळ सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत आल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. तर ज्यांच्याशी मैत्री केली ते जवळचे सहकारी प्रक्ष परस्परांच्या विरोधात उभे ठाकल्याचेही दिसत आहे. या मधून नेमका विजय कोणाचा होणार यावरच राजकीय समीकरणे जुळणार आहेत.
रायगड मध्ये १९५२ ते २०२४ या ७२ वर्षाच्या कालखंडाकडे पाहिले तर सन १९९०पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील निवडणूक शेकाप विरुद्ध काँग्रेस अशीच झालेली आहे. अलिबाग ,पेण ,पनवेल कर्जत त्या मतदारसंघात शेकापने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अधून मधून काँग्रेसनेही या मतदारसंघाचे नेतृत्व केले. तर महाड ,रोहा ,माणगाव ,श्रीवर्धन मतदार संघात मात्र समाजवादी काँग्रेसचे अस्तित्व दिसून आले आहे. सन १९९० मध्ये शिवसेनेने रायगडात पाय रोवल्यावर मात्र राजकीय वातावरण बदलून गेले. मग दुहेरी संघर्ष तिहेरी बनला. शेकाप ,काँग्रेस ,शिवसेना असा राजकीय संघर्ष होत राहिला. सर्वच मतदारसंघात तिहेरी लढत होत राहिली. सन १९९९ मध्ये जिल्ह्यात काँग्रेसचे विभाजन झाले राष्ट्रवादीचे निर्मिती झाली. यामुळे काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले.
राष्ट्रवादीने जिल्ह्यात चांगले बस्तानही बसवले. यामुळे पुढील काळात शेकाप, राष्ट्रवादी, शिवसेना असा राजकीय सामना होत राहिला. परस्पर विरोधी असणारे हे सर्वच राजकीय पक्ष अनेकदा प्रसंग आहे रूप सत्ता मिळण्यासाठी व आहे ती टिकवण्यासाठी एकत्रित आलेले आहेत. यामुळे या युती, आघाड्यांमुळे रायगडची राजकीय समीकरणे अनेकदा बदललेली आहेत. विरोधक असणारे काँग्रेसचे शेकाप सन १९९९ नंतर एकत्र आलेले आहेत. राष्ट्रवादीशीही शेकापचे सूर जुळले होते. तर शिवसेनेने ही शेकापशी हात मिळवणे केली होती. आता परस्पर विरोधी विचारसरणीचे हे पक्ष पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने वा एकत्र आल्याचे दिसत आहेत.
विधानसभा निवडणुकीत रायगड मध्ये एकही उमेदवार नसल्याने काँग्रेसचे अलिबाग ,पेण ,पनवेल मध्ये शेकाप उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर उरण मध्ये हीच काँग्रेस ठाकरे गटाच्या मागे ठामपणे उभी आहे. येथे शेकापनेही आपला उमेदवार उभा केलेला आहे. श्रीवर्धन मध्ये काँग्रेसचे राजेंद्र ठाकूर उभे असले तरी त्यांना एबी फॉर्मच न मिळाल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे.
विधानसभा निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी जिल्ह्यातील आपले अस्तित्व दाखवणारी ठरणारी आहे. जे पक्ष विजय होतील त्यांना जिल्ह्यात काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे तर जे पराभूत होतील त्यांना अस्तित्वासाठी झगडावे लागणार हे नक्की.
*जिवाभावाचे सहकारी परस्परांच्या विरोधात*
रायगडात गेल्या दोन वर्षात झालेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद रायगडात उमटले आहे. दोन शिवसेना ,दोन राष्ट्रवादीही झालेली निर्मिती यामुळे जिल्ह्याचे राजकारणच बदलून गेलेले आहे. २५ वर्ष एकमेकांचे जीवाभावाचे असलेले सहकारीच आता परस्परांच्या विरोधात उभे टाकलेले आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या प्रभावाने रायगडात अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने शरद पवारांचे राष्ट्रवादीचे अस्तित्व जिल्ह्यात नगण्य आहे. तरीही अस्तित्व दाखवण्यासाठी शरद पवार गटाने श्रीवर्धन मध्ये एक उमेदवार उभा केलेले आहे.