निवडणूकीच्या तोंडावरच सुज्ञ, विचारी व जागरुक* *पुरोगामी मतदार कार्यकर्त्यांचे चिंतनीय मनोगत*

65

*निवडणूकीच्या तोंडावरच सुज्ञ, विचारी व जागरुक*
*पुरोगामी मतदार कार्यकर्त्यांचे चिंतनीय मनोगत*

पैसे असतील तरच निवडणूक लढवायची का?*

अरुणकुमार करंदीकर*

*पनवेल शहर प्रतिनिधी*
*मो. क्र. 7715918136*

*सामाजिक कार्यकर्त्यांना मतदारांचा पाठिंबा का नाही?*
मतदारांनी विचार करण्याची गरज ! निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात….!

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसजशा जवळ येतात, तसतसे सत्ताधारी व इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग येतो, गाव पातळीपासून शहरापर्यंत समाजातील कार्यकर्ते, सेवा देणारे लोक यांच्याकडे सहानुभूती असते, पण त्यांच्याकडे पैसा नसल्याने निवडणुकीच्या रिंगणात त्यांना दुर्लक्षित केले जाते.

मतदारांना फक्त बॅनर, पोस्टर, जाहिराती आणि पैशांचा मारा दिसतो – आणि त्यामुळे समाजासाठी काम करणारे प्रामाणिक कार्यकर्ते मागे पडतात.

मतदारांनी विचार करण्याची गरज….!
निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार प्रत्यक्षात समाजसेवेसाठी नाही,तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात. ते मते विकत घेतात आणि सत्तेत आल्यावर त्याच पैशाची वसुली भ्रष्टाचार, टेंडर, कमिशन, आणि करारामधून करतात.

हा खेळ थांबवायचा असेल तर मतदारांनी विचारपूर्वक मतदान करणे अत्यावश्यक आहे.

*सामाजिक कार्यकर्त्यांना पाठिंबा का नाही?*

सामाजिक कार्यकर्ते वर्षानुवर्ष लोकांमध्ये काम करतात, लोकांचे प्रश्न सोडवतात, परंतु निवडणुकीच्या वेळी पैशाची कमतरता असल्याने त्यांना दुर्लक्षित केली जाते.
मतदारांची मानसिकता अशी झाली आहे की “*जो पैसा देईल तोच योग्य उमेदवार*”
हे लोकशाहीसाठी घातक आहे.

*पैशाचा खेळ आणि गुंतवणुकीचा राजकारणात शिरकाव :*

निवडणुका म्हणजे सेवा नव्हे तर गुंतवणूक असा विचार आजकालच्या राजकारणात रुजला आहे.
पैसा खर्च करून मते विकत घेणारे उमेदवार निवडणुका आल्यावर त्या गुंतवणुकीचा परतावा घेण्यासाठी धडपडतात.
यात लोकशाहीचा विसर पडतो आणि भ्रष्टाचार वाढतो.

*मतदारांची जबाबदारी :*
पैसे घेऊन मतदान केल्यावर आपण आपल्या भविष्याची विक्री करतो. विचार करा एक पाचशे रुपयांची नोट घेतल्यावर पुढची पाच वर्ष आपण अन्याय सहन करतो.
मतदारांनी उमेदवाराची प्रामाणिकता, कामाचा हिशोब आणि समाजातील योगदान तपासले पाहिजे.
पैसे नव्हे, विचाराने मतदान करा.

*आपली मानसिकता बदलायला हवी:*

विकासाला प्राधान्य देणारे,जनतेसाठी काम करणारे उमेदवार पुढे यावेत, यासाठी जनतेची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. मतदारांनी हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे , मी मत देतोय समाजासाठी की पैशासाठी?

*सामाजिक बदलासाठी हेच उपाय:*

1) पैशाला नकार द्या, सेवाभावी उमेदवारांना पाठिंबा द्या.
2 )लोकशाही वाचवण्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
3) ” जो पैसा वाटतो, तो तुमचे भविष्य लोटतो “– हे लक्षात ठेवा.
4 )आपल्या गावात, शहरात प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांना उभे करा.
5 )पैशाने नाहीतर जनहिताने नेते ठरवा.

*पैसे असतीलच तरच निवडणूक लढवायची का*, हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारायचा.
कारण पैशाने लढवलेली निवडणूक लोकांसाठी नसते– ती फायद्याच्या व्यवहारासाठी असते.
खऱ्या लोकशाहीसाठी विचारपूर्वक मतदान करणे हीच खरी देशभक्ती आहे.

” पैशाने नाही, विचाराने मतदान करा कारण लोकशाही तुमच्या मताने वाचते !”