काळ्या जादूपायी आईने केली मुलाची हत्या, तूप-मसाले लावून मांस भाजलं!

53

काळ्या जादूपायी आईने केली मुलाची हत्या, तूप-मसाले लावून मांस भाजलं!

कोलकाता:-  काळ्या जादूच्या नादी लागून एका महिलेने आपल्याच तरुण मुलाची हत्या केल्याची भयंकर घटना कोलकात्यात घडली आहे. याहूनही बीभत्स म्हणजे तिने त्याचं मांस तूप आणि मसाले लावून भाजल्याची माहिती मिळत आहे.

वृत्तानुसार, या महिलेचं नाव गीता माहेनसरिया असं आहे. गीताचे तिचा पती अनिल याच्याशी मतभेद असल्याने ती त्याच्यासोबत राहत नाही. गेली अनेक वर्षं ते एकमेकांसोबत राहत नाहीत. त्यांचा मोठा मुलगा अर्जुन 25 हा अनिलच्या संपर्कात होता.

मात्र, गेल्या काही काळापासून बापलेकाचा संपर्क झाला नव्हता. अनिलने अर्जुनच्या फोनवर फोन करूनही त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे अनिलने अर्जुन बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. त्यामुळे पोलीस अर्जुन आणि गीता राहतात त्या बिधाननगर परिसरातील दुमजली घरी थडकले.

तिथे त्यांना संशय आल्याने त्यांनी घराची तपासणी केली. त्यावेळी त्यांना एका पुरुषाच्या हाडांचे अर्धवट जळलेले अवशेष सापडले. घरात त्यावेळी गीता आणि तिचा छोटा मुलगा विदुर हे दोघेही होते. दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. तिथे त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि ते ऐकून पोलीसही शहारले.

गीताने आपल्या मुलाची डोक्यात दगड घालून हत्या केली. त्यानंतर त्याचं मांस भाजलं. मानवी मांसाच्या भाजण्याचा वास येऊ नये म्हणून तिने त्यावर तूप, कापूर आणि मसाले शिंपडले. त्यानंतर तिने त्याची हाडं टॉवेलमध्ये गुंडाळली आणि घराच्या छपरावर नेऊन टाकली.

पोलिसांना तिच्या घरात एक मोठी कढई, जळलेले मास्क, रक्ताने माखलेला दगड, हाडं गुंडाळलेला टॉवेल तसंच काही अन्य आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या. त्या आधारे गीता आणि विदुर यांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्यांची मानसिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी मिळालेले सर्व पुरावे न्यायवैद्यकीय चाचणीसाठी पाठवले आहेत.

या घटनेने गीताचा पती आणि मयत अर्जुनचे वडील अनिल यांना धक्का बसला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अर्जुन याला हृदय आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजार होता. मात्र, त्याखेरीज कुटुंबात काही प्रतिकूल परिस्थिती नव्हती. लहान मुलगा उटीला शिकतो, मुलीचं शिक्षण, व्यवसाय सगळं उत्तम सुरू आहे. मोठं घर, दोन गाड्या आणि दागदागिनेही आहेत. असं असताना काय कारणाने गीताने इतकं भीषण कृत्य केलं असावं ते बुचकळ्यात टाकणारं आहे, असा जबाब अनिल यांनी नोंदवला आहे.