पाणी, रस्ते, रोजगारासह विकास योजना गतिमानतेने राबवणार

                                                                                                     – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

● मनपाच्या विविध विकासकामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ 

● गुंठेवारीचा प्रश्नही लवकरच सोडवणार

●कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी कटाक्षाने बाळगावी 

            औरंगाबाद, दिनांक 12 (जिमाका) : पाणी, रस्ते, रोजगार वृद्धी यासोबत पायाभूत सोयी सुविधांची पूर्तता आणि विकास योजना गतिमानतेने राबवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराची रखडलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे समाधान आहे. ही योजना आगामी सन 2052 वर्षांपर्यंतच्या शहरातील लोकसंख्येचा विचार करता त्यांना लागणाऱ्या पाणी वापराचा अंदाज घेऊन नव्याने आखण्यात आली आहे. गतिमानतेने ती पूर्णत्वास नेण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.

            चिखलठाणा येथील गरवारे क्रीडा संकुल येथे मनपाच्या औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचे प्रत्यक्ष भूमिपूजन आणि आभासी पद्धतीने हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन आणि स्मारक भूमिपूजन, जंगल सफारी पार्क भूमिपूजन, शहरातील विविध रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ श्री. ठाकरे यांच्याहस्ते झाला, यावेळी श्री.ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमास उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सर्वश्री आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, हरिभाऊ बागडे, प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे यांच्यासह विनोद घोसाळकर, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले आदींची उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबाद शहरावर विशेष प्रेम होते. तसेच औरंगाबादकरांचेही स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम होते. त्यामुळे या शहराच्या विकासाला अधिक प्राधान्य आहे. येथील गुंठेवारीचा प्रश्न, सिडकोतील घरे, मालकी हक्कांचा प्रश्न याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातून जात असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणीदेखील मागील आठवड्यात केली. नागपूर ते शिर्डी पर्यंतचा हा महामार्ग 1 मेपूर्वी पूर्णत्वास नेण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या पाहणी दरम्यान काही शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील केली. शेतकरी हा अन्नदाता आहे, त्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे आहे. औरंगाबाद शहरातील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव देखील केंद्र शासनाला पाठविण्यात आलेला आहे.

शासनाच्या विविध योजनांना गती देण्यात येत असून त्या पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्यात येत आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे, आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. तरीदेखील जनतेनेही कोरोनाच्या सद्यकाळात निष्काळजीपणा करू नये. जनतेने शासनाच्या सर्व सूचनांचे यापूर्वीही पालन केलेले आहे. तसेच यापुढेही करावे, जेणेकरून कोरोनाचा प्रसार वाढणार नाही. यासाठी मास्कचा वापर कटाक्षाने करावाच, शारीरिक अंतर राखावे व वारंवार हात धुवावेत, याबाबतही जनतेला श्री. ठाकरे यांनी आवाहन केले.

शहरात उभारण्यात येणारे स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन व स्मारक यामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीयत्वाचे विचार पहावयास मिळतील. या स्मारकातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल, असेही श्री. ठाकरे म्हणाले.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांची माहिती दिली. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योग विभागाच्या पुढाकारातून मेल्ट्रॉन येथे सुसज्ज असे कोविड रुग्णालय उभारण्यात आले. पुढे या रुग्णालयाचा संसर्गजन्य आजारांचा उपचार घेण्यासाठी उपयोग होईल, असे सांगितले. श्री. ठाकरे यांच्याहस्ते आज भूमिपूजन करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतून शहरवासीयांना मुबलक प्रमाणात पाणी मिळण्यास मदत होईल. राज्यातील सर्वात मोठी ही पाणीपुरवठा योजना आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे महिलावर्गाला याचा मोठ्याप्रमाणात लाभ होईल, असेही ते म्हणाले.

शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्यातील पर्यटन केंद्रे जनतेसाठी खुली करण्यात आलेली आहेत. या पर्यटन केंद्रांप्रमाणेच शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन व स्मारक, सफारी पार्क याची भर पडणार आहे. मराठवाड्यात मोठ्याप्रमाणात उद्योग यावेत, बेरोजगारांना रोजगार मिळावा, पाणी टंचाईचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीही शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे श्री. देसाई म्हणाले.

नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई, कल्याण आणि ठाणे येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकांप्रमाणे औरंगाबादेत होत असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन व स्मारकाबाबत समाधान व्यक्त केले. औरंगाबाद शहरातील रस्ते, समृद्धी महामार्ग, कर्जमुक्ती योजना आदींबाबतही शासनाच्या विविध कामांबाबत सांगितले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री.पाटील यांनीही पाणीपुरवठा योजनेचे कौतुक करताना मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. आगामी काळात मराठवाड्यात पाणी टंचाई भासू देणार नसल्याचे सांगितले.

सुरूवातीला श्री. ठाकरे यांना पोलिस आयुक्त कार्यालयाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर श्री. ठाकरे यांच्याहस्ते विधीवत पद्धतीने पूजन करून मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्प व विकास कामांचे भूमिपूजनाच्या कोनशिलेचे अनावरण श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. तसेच आभासी पद्धतीने स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन व स्मारक, सफारी पार्क, शहरातील 23 रस्त्यांच्या कामांचा शुभारंभही करण्यात आला. मनपाच्यावतीने श्री. ठाकरे व मान्यवरांचे श्री. पांडेय यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले. आभार आ. श्री. दानवे यांनी मानले.

 

श्रीखंड्याच्या रूपात मुख्यमंत्री

उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी त्यांच्या भाषणात औरंगाबादच्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत सांगताना ज्या पद्धतीने पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज यांच्या घरातील हौद श्रीखंड्याच्या कावडीने अखेर भरला. या अख्यायिकेचा संदर्भ देत श्री. देसाई यांनी श्रीखंड्याच्या रूपाने मुख्यमंत्री यांच्या हातून या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन होत असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी जनतेला पाणी देण्यासाठी श्रीखंड्याची भूमिका आनंदाने स्वीकारत पाणीप्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here