गोंदिया अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुक

70

गोंदिया अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुक

 गोंदिया:- अर्जुनी मोरगाव निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे जाहीर करताच गावस्तरावरील नवसे-गवसे गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागले आहेत. भेटीगाठी घेण्यास सुरूवात झाली आहे. प्रत्येकाला निवडणुकीत उभे राहण्याची स्वप्ने पडू लागली आहेत.

अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात एकूण 70 ग्रामपंचायती असून, त्यापैकी जून 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत 29 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणुका घोषित होताच गावागावांतील नवसे-गवसे गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या रिंगणात आपणच उभे असू, असे सांगत आहेत. गाव विकासाचे सोयरसुतक राजकारणी मतदारांची सलगी साधून मते मिळविण्यासाठी केविलवाणी धडपड करीत आहेत.

त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत अशी रचना असून, ग्रामपंचायत ही गाव विकासाची महत्त्वाची संस्था आहे. पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, राज्य स्थापनेच्या साठीनंतरही हवा तसा गावांचा विकास झाला नाही. याला जबाबदार संधिसाधू राजकारण आहे. एकदा निवडून आल्यानंतर पाच वर्षे सत्ता भोगून विकासाचे सोयरसुतक नसणे ही बळावत चाललेली प्रवृत्ती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

तालुक्‍यातील प्रत्येकच गावात सुशिक्षित बेरोजगारांची मोठी फौज असूनसुद्धा गावस्तरावर बेरोजगारी दूर करण्यासाठी कसलेही प्रयत्न राजकारण्यांकडून आजपर्यंत झाले नाही.

असा असेल कार्यक्रम

15 डिसेंबर नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करणे, 23 ते 30 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र छाननी, 31 डिसेंबर सकाळी 11 वाजल्यापासून छाननीपत्र मागे घेणे, 4 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, मतदानाचा दिनांक 15 जानेवारी सकाळी 7.30 वाजतापासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत.