पुणे – ‘राज्य सरकारने राष्टीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय विचार साधना या प्रकाशनाकडून २० रुपयांना असलेली पुस्तके ५० रुपये एवढ्या जादा दराने खरेदी केली असून त्याची किंमत आठ कोटी १७ लाख रुपयांच्या घरात आहे. या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे,’ असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या पुस्तकामध्ये कौमार्यभंग, विषयलोलुपता, इंद्रियसुख आदी आक्षेपार्ह उल्लेख असून राज्य सरकार लहान मुलांवर असे संस्कार करणार आहे का? सरकारने या पुस्तकांचे वितरण तातडीने थांबवावे अशी मागणी करत सातत्याने वादग्रस्त निर्णय घेणारा शिक्षण विभाग हा एक विनोद झाला असल्याची टीका विखे यांनी केली आहे. काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत विखे-पाटील यांनी शिक्षण विभागावर टीका करताना तावडे यांच्यावर तुफान टोलेबाजी करून ते केवळ चमको असल्याचे विखे-पाटील म्हणाले. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, महिला आघाडीच्या कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, माजी आमदार दिप्ती चवधरी,बाळासाहेब शिवरकर, माजी उपमहापौर आबा बागूल, नगरसेवक अजित दरेकर उपस्थित होते.
राज्य सरकारकडून ‘अवांतर वाचन’ या उपक्रमातर्गंत पुस्तके खरेदी केली जातात. त्यामध्ये सत्यकथा व ऐतिहासिक पुस्तकांचा प्रामुख्याने समावेश असतो. सरकारने या पुस्तकांमध्ये धार्मिक आणि पौराणिक पुस्तकांचाही त्यामध्ये समावेश केला आहे. यातील पुस्तकांमध्ये कौमार्यभंग, विषयलोलुपता, इंद्रियसुख आदी आक्षेपार्ह उल्लेख आहेत. सरकार राज्यातील लहान मुलांवर हे संस्कार करणार आहेत का, सरकारने या पुरस्कांचे वितरण तातडीने थांबवावे, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकेही खरेदी करण्यात आले असून ही पुस्तके पौराणिक, धार्मिक वा ऐतिहासिक अशा कुठल्या गटात बसतात, हेही सरकारने स्पष्ट करावे, असे विखे पाटील म्हणाले.