जीवघेणा संघर्ष! आलापल्लीच्या जंगलात वाघ मृतावस्थेत आढळला, दोन वाघांच्या लढाईत मृत्यू झाल्याचा संशय
*नंदलाल एस. कन्नाके*
*जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी*
*गडचिरोली*
*मिडिया वार्ता न्युज गडचिरोली*
*मो.नं. 7743989806*
*गडचिरोली* – आलापल्ली वन विभागातील आल्लापल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत नेंडर बीट, खंड क्र. 12 मध्ये एक पट्टेदार वाघ रविवारी मृतावस्थेत आढळला. तो अवघा दीड वर्षाचा नर आहे. त्यामुळे मोठ्या नर वाघासोबत झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सदर घटना शनिवारी रात्री घडली असण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. दरम्यान ट्रॅप कॅमेराच्या माध्यमातून या घटनेचा अधिक उलगडा करण्याचे काम सुरू आहे.
आलापल्ली जंगल परिसरात वाघांचे अस्तित्व असून मागील महिन्यात आलापल्ली वनपरिक्षेत्रातील मौसम येथे एका पट्टेदार वाघिणीची शिकार करण्यात आली होती. त्यामुळे वनविभागाने या प्रकरणाचाही गांभीर्याने तपास केला जाणार आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. प्रस्थापित परिक्षेत्रात आधीपासून असलेला वाघ अन्य कोणत्याही दुसऱ्या नर वाघाला आपल्या परिक्षेत्रात येऊ देत नाही. त्यामुळे दोन नर वाघ आमने- सामने आल्यास त्यांच्यात लढाई होण्याचे प्रसंग अनेक वेळा होतात. ही लढाई इतकी भीषण असते की दोन्ही वाघ गंभीर जखमी होतात. त्यात कमजोर असलेला वाघ हार पत्करून निघून जातो किंवा प्रसंगी त्याचा मृत्यू ओढवतो. या वाघाचा मृत्यू त्यातूनच झाला असण्याची शक्यता वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी वन अधिकारी तूर्त उपलब्ध होऊ शकले नाही.