रा.जि.प.च्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचा-याचा 1 कोटी 19 लाखांचा घोटाळा.
घोटाळा 6 कोटींच्या असण्याचा दावा.
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात 1 कोटी 19 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघड झाला असून अलिबागच्या पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे याने हा घोटाळा केला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रा.जि.प. डॉ. भरत बास्टेवाड यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून सदर फरकाची रक्कम आपल्या व पत्नीच्या खात्यात वळती करून नाना कोरडे याने हा गैरव्यवहार केला आहे. हा गैरव्यवहार करताना धनादेशांवर वरिष्ठ अधिकारी यांच्या बनावट सह्या केल्या आहेत. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात येतो. पगार व पगारव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर फरक देण्यासाठी दोन स्तर स्थापन करण्यात आले आहेत. याच बाबीचा ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या अलिबाग उपविभागातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे याने फायदा घेतला.पाणी पुरवठा अलिबाग विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन त्यांच्या खात्यात जमा होत होते. मात्र नाना कोरडे याने कर्मचाऱ्यांना पगारव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून मागील वर्षभरात सुमारे 1 कोटी 19 लाख रुपयांचा गैरव्यवहार केला. सदर बाब इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन करताना जिल्हा परिषदेतील एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. यांनतर सदर बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. डॉ. भरत बास्टेवाड यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांना चौकशीचे आदेश दिले. तसेच उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली.
सदर समितीने केलेल्या चौकशीत नाना कोरडे याने आपल्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची धनादेशांवर बनावट सही करून, पगाराव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी रक्कम परस्पर स्वतःचे खात्यात वळती केली. तसेच काही रक्कम पत्नी सोनाली कोरडे हिच्या खात्यात वळती केल्याचे निदर्शनास आले आहे. सदर रक्कम ही 1 कोटी 19 लाख रुपये इतकी आहे.
-चौकट –
नाना कोरडे हा पाणी पुरवठा विभागात कार्यरत होण्याआधी महिला व बालविकास विभागाच्या अलिबाग व म्हसळा प्रकल्प येथे 2020 पासून कार्यरत होता. याठिकाणीही त्याने असाच गैरव्यवहार केला असल्याची माहिती असल्याचा दावा बास्टेवाड यांनी केला आहे. या ठिकाणी कोरडे याने 5 ते 6 कोटींचा गफला केला असल्याची माहिती असून सी.ई.ओं.नी नेमलेल्या समितीने याबाबतही चौकषी करावी अषी मागणी सावंत यांनी केली आहे.