वेजगावात वाघाचा हल्ला, दोघेजण गंभीर जखमी
मिडिया वार्ता न्युज ने कालच घेतली होती दखल तरीही वनाधिकारी झोपेत
राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
चंद्रपूर: गोंडपिपरी तालुक्यातील वेजगाव येथे वाघाने हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारी १.५० वाजताच्या सुमारास घडली. शरद बोपनवार तोहोगाव, सुरेश मत्ते विरूर असे गंभीर जखमींचे नावे आहेत.
वेजगाव, आर्वी, तोहोगाव, सरांडी या परिसरात वाघाने धुमाकूळ घालून १५ जनावरांचा बळी घेतला होता. त्यानंतर या परिसरात नागरिकांना दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन होत होते त्यामुळे भीतीचे वातावरण होते.
गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वेजगाव शेतशिवारात वाघ आला होता. वाघाला बघण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. यादरम्यान वाघाने शरद बोपनवार, सुरेश मत्ते या दोघांवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने राजुरा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मागील काही दिवसापासून तोहोगाव, आर्वी, वेजगाव परिसरात वाघाने धुमाकूळ हल्ला करीत असतांना वनविभाग मात्र, कोणतीही कारवाई करतांना दिसून आले नाही. वाघाच्या हल्ल्यानंतर पोलिस व वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली आहे. सदर वाघाला जेरबंद करण्यासाठी परिसरात तीन पिंजरे लावण्यात आल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. सदर वाघाचा त्वरीत बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.