धान कापणी करून घरी परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला !
वाहन उलटून २७ महिला मजूर गंभीर जखमी
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847
भंडारा : धान कापणी केल्यानंतर एका वाहनांमध्ये बसून गावाकडे परतणाऱ्या महिला मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह २७ महिला मजूर जखमी झाल्याची घटना भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील सोनेगाव येथे घडली. या सर्व जखमी महिला पवनी तालुक्यातील नेरला या गावातील रहिवासी आहेत. नेरला येथून त्या एका वाहनाने पवनी तालुक्यातील सोनेगाव इथे धान कापणीसाठी गेल्या होत्या. दुपारनंतर त्यांचे काम आटोपल्यामुळे त्या सर्व महिला चालकासह वाहनांमध्ये बसून गावाकडे परत येत असतानाच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर सर्व जखमींना अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या सर्व जखमी महिलांवर उपचार सुरू आहे.
*वाहन उलटून २७ महिला मजूर जखमी*
भंडार जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान कापणीची लगबग सुरू आहे. विदर्भात अवकाळी पावसाचे सावट लक्षात घेता शेतकरी हार्वेस्टर आणि मजुरांच्या साहाय्याने धान कापणी उरकून घेत आहेत. त्यामुळे मजुरांची मोठ्या प्रमाणात मागणी असून धान कापणीला मजूरच मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, दूरवरून वाहनाने मजुर नेऊन शेतीची कामे उरकून घेतली जात आहेत. रविवार सकाळी सर्व मजूर हे अड्याळजवळील नेरला येथील गावातून सोनेगाव येथे धान कापणीला टाटाएस वाहनने (एमएच ३६ एफ १०६०) नेहमीप्रमाणे जात होते.
त्यानंतर काम आटपून परत येत असतांना वाहनचालक महेंद्र मुरकुटे (रा. नेरला) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन शेतात उलटले. त्यानंतर या अपघातात २७ महिला मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अपघाताची माहिती गावात मिळताच गावातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या सर्व जखमी महिलांवर उपचार सुरू आहे.