सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम नाईक यांच्या प्रयत्नांना यश
माणगाव उपजिल्हा रुग्णालयाला मिळणार कायमस्वरूपी डॉक्टर…
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगाव :- माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालय यामध्ये प्रतिनियुक्तीवर डॉक्टर आहेत. या रुग्णालयातील कायमस्वरूपी डॉक्टरांना मात्र प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आलेले आहे. याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे माणगाव तालुका अध्यक्ष दत्ताराम नारायण नाईक यांनी याबाबत लेखी तक्रार दिल्यानंतर त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून माणगाव उपजिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी डॉक्टर मिळणार असून प्रतिनियुक्तीवर असलेल्या डॉक्टरांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात येणार आहे.याबाबतचे वृत्त असे की, दत्ताराम नाईक यांनी दि.२७ एप्रिल २०२४ रोजी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे प्रतिनियुक्तीवर असलेले डॉ. सचिन गोमसाळे यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना त्यांची मूळ नेमणूक असलेल्या रोहा येथील रुग्णालयात कार्यभार देण्यात यावा व माणगाव येथे असलेले कायमस्वरूपी डॉ. शंतनू डोईफोडे यांची महाड येथे असणारी प्रतिनियुक्ती रद्द करून माणगाव येथे कायमस्वरूपी कार्यभार सोपवण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय अलिबाग यांना लेखी पत्र दिले होते.
माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असताना डॉ. गोमसाळे हे गेली एक वर्षापासून रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर आहेत.रोह्यासारख्या रुग्णालयात नेत्रतज्ञ म्हणून डॉ. गोमसाळे कायमस्वरूपी नियुक्तीवर असताना तसेच माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. डोईफोडे हे नेत्रतज्ञ म्हणून कायमस्वरूपी असताना त्यांची महाड येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली व डॉ. गोमसाळे यांची माणगाव येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली. डॉ. डोईफोडे हे कायमस्वरूपी असताना त्यांची महाड येथे प्रतिनियुक्ती करून डॉ. गोमसाळे यांची रोहा येथून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्ती का करण्यात आली हे मात्र समजू शकले नाही असा प्रश्न दत्ताराम नाईक यांनी उपस्थित केला होता. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी असलेल्या तीन डॉक्टरांपैकी डॉ. समीर शेलार, डॉ. डोईफोडे, डॉ. अरुणा पोहरे यापैकी कोणाकडेही माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचा कार्यभार देण्यात यावा तसेच ऑन कॉल बेसिक व फुल टाईम बेसिस पदावर नेमणूक केलेले डॉक्टर वेळेत ओपीडी देत नसल्यामुळे या रुग्णालयात वैद्यकीय सेवा मिळत नव्हती उलट अपघाती रुग्णास कारण नसतानाही अलिबाग किंवा अन्य प्रायव्हेट हॉस्पिटलला पाठविण्यात येत होते. त्यामुळे या रुग्णालयाला कायमस्वरूपी डॉक्टरांची अत्यंत गरज आहे. कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करून न दिल्यास १४ मे रोजी उपजिल्हा रुग्णालयासमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांसह आमरण उपोषणाला बसणार असल्याचे अर्जात म्हटले होते.
दत्ताराम नाईक यांच्या अर्जाची दखल जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय अलिबाग यांनी घेऊन चौकशी करण्यासाठी आर एम ओ डॉ. किरण शिंदे यांना सोमवार दि. १३ मे रोजी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यामध्ये दत्ताराम नाईक यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून लवकरच माणगाव उपजिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या डॉक्टरांची प्रतिनियुक्ती रद्द करून कायमस्वरूपी डॉक्टरांना त्यांच्या मूळ ठिकाणी माणगाव येथे नियुक्ती देऊन प्रति नियुक्तीवर आलेल्या डॉक्टरांची प्रति नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे. तसेच अजूनही काही डॉक्टरांची कायमस्वरूपी नेमणूक या रुग्णालयात करण्यात येणार असल्याचे आश्वासन डॉ. किरण शिंदे यांनी दिले आहे. यावेळी दत्ताराम नाईक यांच्या समवेत संघटनेचे कार्यकर्ते संगिताताई चव्हाण, मंगेश मेस्त्री,विरारचे नगरसेवक सुधीर सोनवणे,सय्यद चिमावकर,फरीद डावरे उपस्थित होते.