बंदी पूर्वीच नौका बंदरात

बंदी पूर्वीच नौका बंदरात

वादळी परिस्थितीचा परिणाम;हंगामातील महत्त्वाचे दिवस वाया

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- मासेमारी बंदी कायद्यानुसार एक जून पासून खोल समुद्रातील मासेमारी बंद होणार आहे. मात्र कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांना त्यापूर्वीच मासेमारी नौका बंदरात सुरक्षित नांगरून ठेवावे लागल्या. सध्या वादळी हवामान असल्याने समुद्रात वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे मच्छीमारी करणाऱ्यांनी खबरदारी म्हणून आपल्या नौका बंदरात आणल्या आहेत.
हंगामातील शेवटचे दिवस महत्त्वाचे असतात. या काळात जास्तीत जास्त मासळी पकडून हंगामातील नुकसान कमी करण्याचा प्रयत्न असतो. परंतु वादळी हवामानामुळे मच्छीमारांचे शेवटचे तीन आठवडे फुकट जाणार आहेत.
पावसाळ्यात समुद्र खवळतो त्यामुळे मासेमारी बोटीचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर हा कालावधी मत्स्य जीवांच्या प्रजनाचा असतो.खोल समुद्रातील मत्सजीव अंडी घालण्यासाठी किनाऱ्यालगत येतात. त्याची शिकार थांबवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने बंदी घातली जाते. पश्चिम किनारपट्टीवर१ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारी बंदी केली जाते.
हवामान विभागाने ३ मे रोजी वादळाची सुचना दिल्यानंतर काही मच्छीमारांनी मासेमारी जाण्यास टाळले आहे. बुधवार, गुरुवारी वादळी वाऱ्यामुळे अलिबाग, साखर,आक्षी, बोडणी, रेवस येथील नौका भरकटल्या होत्या, तर कायमचे नुकसान झाले.

7200 बोटीकिनारी वीसावल्या
मासेमारी नौकांवर काम करणाऱ्या कामगारांच्या हाताशी काम नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.हवामान शांत झाल्यानंतर मासेमारी व्यवस्थित होईल. याबद्दल कोणती शाश्वती नसल्याने परप्रांतीय कामगार आपल्या गावाकडे जाण्याची तयारी करत आहेत. वादळी परिस्थिती असल्याने सुमारे सात हजार दोनशे मच्छिमारी नौका किनाऱ्यावर विसावल्या आहेत.

मासेमारीची अधिसूचना अद्याप आलेली नाही परंतु नेहमीप्रमाणे एक जून पासून मासेमारी बंद होईल हे सर्व मच्छीमारांना माहिती आहे. त्यानुसार मच्छीमार बंदी लागू झाल्यानंतर नौका बंदरात आणून सुरक्षित नांगरून ठेवतात.
संजय पाटील
सहाय्यक उपायुक्त मत्स्य व्यवसाय विभाग रायगड

जीवावर उदार होऊन मासेमारी करणारा दर्याचा राजा नेहमी उपेक्षिताचे जिने जगत असतो. सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा मिळण्यास खूप वेळ जातो.त्यामुळे मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळावा ही आमची मागणी कायम आहे
नागेश पेरेकर
मच्छीमार कार्यकर्ता आग्राव