3150 किलो प्लास्टीकचा मोठा साठा जप्त, बागला चौकातील गोडाऊनवर मनपाची कारवाई
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो: 8830857351
चंद्रपूर,14 जून: बागला चौक येथील एका गोडाऊनवर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने मंगळवारला सायंकाळच्या सुमारास कारवाई करून 3150 किलो प्लास्टीक जप्त केले. प्लास्टीकचा साठा करणार्या गोडाऊन मालकास 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
बागला चौक येथील कोठारी यांच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टीक साठा केला गेला असल्याची माहीती मनपा उपद्रव शोध पथकास मिळाली होती. माहितीच्या आधारे पाहणी केली असता हा साठा हा मलपत सिंग यांच्या नावे असून तो गोडाऊनमध्ये उतरविण्यात आल्याचे आढळून आले.
एकदाच वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार 500 रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर 5 हजार रुपयांपर्यंत दंड, दुसर्यांदा वापर केल्यास 10 हजार रुपये, तर तिसर्यांदा गुन्हा केल्यास 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.
मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असून प्लास्टीक पिशवीला पर्याय म्हणून मनपामार्फत विकल्प थैला नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत 723 दुकानदारांनी विकल्प थैलाच्या वापरास सुरवात केली असुन मनपाद्वारे 40557 कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले आहे. ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संतोष गर्गेलवार, स्वच्छता निरीक्षक जगदीश शेंद्रे, मनीष शुक्ला, अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे विक्रम महातव, डोमा विजयकर, अमरदीप साखरकर यांनी केली.