रायगड ते अक्कलकोट एकच आवाज : प्रविणदादांवरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा!

रायगड ते अक्कलकोट एकच आवाज : प्रविणदादांवरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा!

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिले राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग,; बहुजन चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत, शिवशाही, फुले, आंबेडकर यांचे विचार समाजात पोहोचवणारे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर दि. १३ जुलै २०२५ रोजी अक्कलकोट येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेनंतर शिवराज्य कामगार ब्रिगेडने सरकारला थेट इशारा दिला असून हल्लेखोरांवर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गेल्या ४० वर्षांपासून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत कार्यरत असलेल्या प्रविणदादा गायकवाड यांच्यावर दिपक सिताराम काटे व त्याच्या साथीदारांनी अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमादरम्यान शाईफेक करत जीवघेणा हल्ला केला. या गुन्हेगारांची पार्श्वभूमी पाहता ते पूर्वीपासूनच गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले आहे. काही आरोपी फरार असून त्यांच्यावर तात्काळ ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी तीव्र होत आहे.
रायगड जिल्ह्यातही संतापाचा उद्रेक – प्रशासनाला निवेदन सादर
या हल्ल्याच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी निवासी उप जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली आहे. हल्लेखोरांना जेरबंद करून पुरोगामी कार्यकर्त्यांना शासनाने संरक्षण द्यावे, अशी स्पष्ट भूमिका शिवराज्य कामगार ब्रिगेडचे अध्यक्ष शैलेश चव्हाण यांनी मांडली.
आकाश राणे, संजोग पालकर, निलेश मलबारी, निलेश पाटील, तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवराज्य कामगार ब्रिगेडचा सरकारला थेट इशारा!
“प्रविणदादांवर झालेला हल्ला हा फक्त एका व्यक्तीवर नव्हे, तर संपूर्ण बहुजन समाजाच्या अस्मितेवर व पुरोगामी विचारांवर आहे. आम्ही कायदा आणि संविधान मानणारे आहोत, पण अशा भ्याड हल्ल्यांना मूकपणे सहन करणार नाही. सरकारने याची गंभीर दखल घेऊन कारवाई न केल्यास ‘शिवशाही’ स्टाईलने उत्तर दिले जाईल,” असा स्पष्ट इशारा शिवराज्य कामगार ब्रिगेडने दिला आहे.
पुरोगामी विचारवंतांना संरक्षणाची मागणी
राज्यात फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे कार्य करणाऱ्या लेखक, वक्ते, कार्यकर्त्यांना वाढत्या धमक्या व हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने सुरक्षा कवच उभे करावे, अशी ठाम भूमिका रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रातील पुरोगामी कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
सरकारपुरस्कृत गुन्हेगारांचा संशय?
या हल्ल्यामागे काही सत्ताधारी गटांचा अप्रत्यक्ष हात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, ‘या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त असल्याचा संशय दाट आहे’ असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.