धनलक्ष्मी कॉलेज व वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती मोहीम

धनलक्ष्मी कॉलेज व वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती मोहीम
विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियमांचे महत्त्व पटवले

नाशिक प्रतिनिधी : ज्ञानेश्वर तुपसुंदर
मो. ८६६८४१३९४६

नाशिक | पाथर्डी फाटा परिसरात मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था, नाशिक संचालित धनलक्ष्मी प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने आणि शहर वाहतूक पोलीस विभागाच्या सहकार्याने प्रभावी वाहतूक जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

या उपक्रमात कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी “हेल्मेट वापरा”, “सिग्नल पाळा”, “ओव्हरस्पीड टाळा” अशा विविध घोषवाक्यांचे फलक आणि पोस्टर्स हातात धरून रस्त्याच्या कडेला उभे राहत नागरिकांचे लक्ष वेधले. या माध्यमातून त्यांनी वाहतूक नियमांचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

वाहतूक पोलीस अंमलदारांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी वाहनचालकांना थांबवून वाहतूक नियमांचे पालन का आवश्यक आहे, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अपघात टाळण्यासाठी हेल्मेट, सीट बेल्ट आणि सिग्नल यांचे पालन करणे किती आवश्यक आहे, हे त्यांनी उदाहरणांसह समजावले.

विशेष म्हणजे, मागील चार वर्षांपासून धनलक्ष्मी कॉलेजकडून ही वाहतूक जनजागृती मोहीम सातत्याने राबवली जात आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.

या उपक्रमात कॉलेजचे शिक्षक पुंजाराम खादगीर, तसेच पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर, हवालदार योगेश रेवगडे, पोलीस अंमलदार मुकेश महाले आणि पो.अं. पूजा बस्ते यांनी विशेष सहभाग घेतला.

या मोहिमेमुळे रस्त्यावरील नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी हे समाजासाठी सकारात्मक संकेत असल्याचे अनेकांनी नमूद केले.