मूल असे घडते — करिअर असे निवडा.

मूल असे घडते — करिअर असे निवडा.

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग :- आयुष्यात करिअरच्या दृष्टीने दहावी महत्त्वाचा टप्पा होय. एस एस सी म्हणजेच स्मार्ट स्टडी फॉर करिअर आणि एच एस सी म्हणजेच हायर स्टडी फॉर करिअर. म्हणून या वर्षांमध्ये भरपूर अभ्यास करायचा आहे.
करियर निवडताना आपण अगोदर एक मोठी डायरी घ्या. त्यात रोज घडलेल्या घटनांची व वाचलेल्या नवीन माहितीची नोंद करत जा. तसेच एका पानावर *आवड* असा शब्द लिहून तुम्हाला काय काय आवडते, त्याची यादी तयार करा. आपल्याला शंभरेक गोष्टी आवडत असतात. त्यापैकी एकात उत्कृष्ट करिअर होऊ शकते. काही गोष्टी आवडतात पण म्हणून त्यात करिअर होऊ शकत नाही. जे आवडतं ते लिहायला भरपूर वेळ घ्या. सर्व आठवून व्यवस्थित लिहा.

त्यानंतर पुढील पानावर *क्षमता* हा शब्द लिहा आता क्षमता *आर्थिक* *बौद्धिक* *शारीरिक* अशी असते. तुम्हाला जे आवडतं त्यात करिअर करण्यासाठी आवश्यक आर्थिक क्षमता, तुमच्या कुटुंबाची पैसे खर्च करण्याची तयारी आहे का ? बर, आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती नसेल तर नातेवाईक शिक्षण खर्च देतील का ? किंवा दानशूर व्यक्ती, धर्मादाय संस्था, बँक लोन, उद्योगपती, शिष्यवृत्ती याद्वारे आर्थिक मदत मिळवून शिक्षण पूर्ण करता येईल का? याचा विचार करून ठेवा बरं दुसरे जे तुम्हाला आवडतं ते शिक्षण पूर्ण करण्याची तुमची बौद्धिक क्षमता आहे का ? याचाही विचार करून ठेवा काही करियर मध्ये शारीरिक क्षमता महत्त्वाची असते. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना *पायलट* व्हायचे होते त्यांच्याकडे बौद्धिक क्षमता नक्कीच होती परंतु शारीरिक क्षमता कमी असल्यामुळे त्यांना ते स्वप्न सोडून द्यावे लागले व ते पुढे भारताचे महान शास्त्रज्ञ बनले नर्स बनायचे आहे पण रक्त पाहिले की चक्कर येऊन चालेल का? तर नाही.
असा क्षमतेचाही विचार आपण करून ठेवायचा आहे आता आवड आहे त्याची क्षमता आहे मग तिसरा *संधी* हा शब्द लिहा. आवड व क्षमता असूनही जिथे हा कोर्स उपलब्ध आहे तिथे जाण्यासाठी संधी आहे का? आई-वडील पाठविणार आहेत का? तिथे प्रवेश मिळणार आहे का? तिथे आवश्यक सोयीसुविधा आहेत का? कोर्स निश्चित पूर्ण होईल ना ? येणाऱ्या अडीअडचणींना तोंड देण्याची तयारी आहे ना ? या आणि इतर सर्व बाबींचा विचार करून ते लिहून ठेवा. आता आपण जे करियर निवडणार आहोत, त्याच्याशी आपला स्वभाव, आपली बैठक, एकाग्रता, नेतृत्व गुण, जबाबदारी विकेंद्रीकरण, सामुहिक वृत्तीने काम करणे, स्वतः काम करणे व दुसऱ्यांकडून काम करून घेणे या सर्व वृत्ती, बाबी यांचाही विचार होणे अपेक्षित आहे.
मग *आवड* *संधी* आणि *क्षमता* यांचा विचार करून आपण आपले करिअर निवडू शकता.
जे आवडतं ते केलं की ते उत्कृष्ट घडतं व त्यात मन लावून उच्च शिखरावर पोहोचता येतं आणि मग खऱ्या अर्थाने करिअर घडतं.
पालक व पाल्य यांनी लक्षात ठेवा करियर आई-वडिलांचे स्वप्न ऐकून होत नाही तर करिअर त्यात करायच असतं, जे आपल्याला आवडतं तर त्यात यशस्वी होता येत.
दुसऱ्याच स्वप्न आपल्याला आवडत नसतानाही करिअर म्हणून निवडलं तर ती आत्महत्या ठरेल.
मात्र तुम्हाला आवडत असणार क्षेत्रच आई-वडिलांचे स्वप्न असेल तर मात्र दुधात साखर.
करिअर निवडीसाठी आपणा सर्वांना शुभेच्छा.

*श्रीमान* *ज्ञानेश्वर* *विठ्ठल* *कुलकर्णी* .

संस्कृत अध्यापक तथा करिअर मार्गदर्शक, समुपदेशक.

लेखक २१ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात संस्कृतभाषातज्ञ आणि व्यवसाय मार्गदर्शक व शालेय समुपदेशक करिअर विज्ञ म्हणून कार्यरत आहेत. महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हाशिवरे येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.