निवेदिता महिला क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
नवरगाव : निवेदिता महिला क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नवरगाव ही 21 वर्षांपासून आर्थिक व्यवहारासोबतच सामाजिक दायित्व निभावत अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असते. मार्च 2023 च्या शालांत, उच्च माध्यमिक व विद्यापीठ परीक्षेत नवरगावातील सर्व शाळा व महाविद्यालयातून प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंताचा सत्कार सोहळा संस्थेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. जगदीश हेडावू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रा. राजेश डहारे सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही यांच्या शुभहस्ते गुणवंतांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक उपक्रमांतर्गत ५ भजन मंडळींना आवश्यक भेटवस्तूचे वाटप करण्यात आले तसेच आकस्मिक वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या देलनवाडी येथील स्व. कल्पना प्रकाश झोडे व स्व. अंजना रूपचंद पुस्तोडे यांच्या कुटुंबीयांना संस्थेतर्फे आर्थिक सहायता निधी देण्यात आली. कोण होणार करोडपती या ज्ञानाच्या अफलातून खेळात सहभाग घेऊन मोठी राशी संपादित केल्याबद्दल मोहित गुलाब सोनवाणे, नवरगाव यांना शाल व सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणात गुणवंत विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व भगिनी निवेदिता यांचे चरित्र वाचावे व त्यातून प्रेरणा घ्यावी, आपण समाजाचे काही देणे लागतो हा भाव ठेवून समाजाची व राष्ट्राची सेवा करण्याचा प्रयत्न करावा असे विचार व्यक्त केले. अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ध्येय निश्चित करून ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. स्वतःचे सामर्थ्य तुम्हीच ओळखून असता त्यामुळे आपल्याला काय बनायचं आहे त्या दृष्टीने प्रयत्न करीत राहा असे विचार ठेवले. प्रास्ताविक व परिचय संस्थेच्या उपाध्यक्षा प्रज्ञा दीपक कवासे यांनी केले सोहळ्याचे संचालन प्रा. विष्णू बोरकर यांनी केले कार्यक्रमाला संचालक मंडळ, व्यवस्थापक, गावातील प्रतिष्ठित मंडळी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.