अलिबाग भाजपाच्या दहीहंडी स्पर्धा चषकाचे अनावरण
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- भाजपच्या वतीने अलिबाग शहरात दहीहंडी स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेत तब्बल 2 लाख 22 हजारांचे बक्षिस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत देण्यात येणा-या चषकाचे अनावरण गुरुवारी ता.14 करण्यात आले. या वेळी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा पाटील, तालुकाध्यक्ष अॅड. अंकित बंगेरा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
शनिवारी साजरा होणा-या गोपाळकाल्यानिमित्त अलिबाग तालुका भाजपतर्फे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 42 पथकांनी नावनोंदणी केली आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू हरमित सिंग, अभिनेत्री सोनाली पाटील, श्वेता खरात, भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार पंडित पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. त्याचप्रमाणे या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचीही मेजवानी नागरिकांसाठी असणार आहे. या स्पर्धेत विजयी पुरूष पथकाला 2 लाख 22 हजार तर महिला पथकाला 1 लाख 11 हजारांचे बक्षिस व चषक देण्यात येणार आहे. तसेच 6 थरांची सलामी देणा-या पुरूष पथकाला 11 हजार 111 रु. व 5 थरांची सलामी देणा-या महिला पथकाला 15 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. यासोबतच बाळगोपाळांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचेही आयोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे. ही स्पर्धा शहरातील मयूर बेकरीसमोर, भाजपच्या जुन्या कार्यालयाजवळ होणार असून नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.