जनता महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर संपन्न
अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर, 14 सप्टेंबर:जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे नुकतेच नवमतदार नोंदणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष तसेच निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. शिबिराचे आयोजन जनता महाविद्यालयातील भूगोल आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर जिल्ह्याच्या उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) निकिता ठाकरे मॅडम ह्या होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले की प्रत्येक नवीन मतदार हा नोंदणीकृत झालाच पाहिजे, देशाचे भविष्य या नवीन मतदारांवर आणि नागरिकांवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणाने स्वतःची जबाबदारी म्हणून मतदार यादीत नाव नोंदवावे आणि मतदान सुद्धा करावे.
शिबिराच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आशिष महातळे यांनी सुद्धा उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यांनी देशातील वाईटाच्या विरोधात तरुणांनी मतपेटीतून विरोध करावा, लोकशाहीप्रधान देशात मतपेटीतून समर्थन आणि मतपेटीतून विरोध हाच उपाय आहे. वाईट लोक संसदेत जात असतील तर मतदान न करणारे मतदार आणि अशा वाईट लोकांना निवडून पाठवणारे मतदार हेच मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत, त्यामुळे शिक्षणाचा वापर करावा, पुरेपूर विचार करावा आणि मगच मतदान करावे, योग्य व्यक्तीलाच निवडून पाठवावे असे भावपूर्ण आवाहन त्यांनी केले.
या शिबिराचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर बलकी यांनी केले, प्रास्ताविक निवडणूक विभागाचे महाविद्यालयातील नोडल ऑफिसर डॉ. योगेश दूधपचारे यांनी तर आभार प्रदर्शन मराठी विभागातील प्राध्यापक महेंद्र बेताल यांनी केले. यावेळी शिबिरात १०० च्या वर विद्यार्थ्यांनी नवीन मतदार म्हणून आपल्या नावाची नोंदणी केली. शिबिराला महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक, कला वाणिज्य आणि विज्ञान विभागातील नव मतदार मोठ्या संख्येत उपस्थित होते. शिबिराला यशस्वी करण्यासाठी अशिक्षकेत्तर कर्मचारी निर्दोष दहिवले, प्रभाकर नेवारे यांनी परिश्रम घेतले.