मोखाडा महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता मंडळाचे उद्घाटन संपन्न

50

मोखाडा महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता मंडळाचे उद्घाटन संपन्न

सुनिल जाबर 

जव्हार प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात असलेले रयत शिक्षण संस्थेच्या, लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा येथे काल दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी येथे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय पालघर, आणि शिक्षक संस्था पालघर, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, मोखाडा व महाविद्यालयाचे एन.एस.एस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात “निवडणूक साक्षरता मंडळा”चे उद्घाटन संपन्न झाले. सदर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या स्वागतासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. एस.आर. व्हंडे यांनी यांनी करून दिली. 

    या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या ॲड.संजीव जोशी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकशाहीची जीवन प्रणाली, मतदानाचे हक्क व आपले अधिकार याविषयी माहिती दिली. तसेच लोकशाही व्यवस्थेत सक्रिय सहभाग घेतल्याशिवाय आपल्याला विकासावर बोलण्याचा अधिकार नाही याचीही जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले श्री.मयूर खेंगले (तहसीलदार मोखाडा) यांनी देखील विद्यार्थ्यांना लोकशाही व त्याची नीतिमूल्य पटवून दिली. तसेच जिल्हा प्रकल्प समन्वयक श्री. सुशील शेजुळे यांनी निवडणूक साक्षरता मंडळ व या मंडळाची भूमिका याविषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्याकरिता प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली व विजेत्या विद्यार्थ्यांना पेन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. निवडणूक साक्षरता मंडळाचे नोडल अधिकारी म्हणून महाविद्यालयातील प्रा. एस.आर. व्हंडे व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जगदीश खाडे व प्रणाली बात्रे यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले.  

        या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एल.डी.भोर साहेब यांनी विद्यार्थ्यांना संविधानाने दिलेले अधिकार सांगितले व लोकशाहीला बळकट करण्यासाठी तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन देखील केले.सदर कार्यक्रमात मा. हनीफ शेख व मा. वामन दिघा हे मोखाडा परिसरातील नामांकित पत्रकार देखील उपस्थित होते. तसेच नायब तहसीलदार श्री.अभय टकले, महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वाय. एच. उलवेकर यांनी केले तर आभार प्रा. एस. जी. मेंगाळ यांनी मानले.