मंगळवारी विदर्भात जोरदार पाऊसाचा, हवामान विभागाने दिला गंभीर इशारा.


प्रतिनिधी

नागपूर : बंगालच्या उपसागरात नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पुढील चार-पाच दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे. मंगळवारी नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.
विदर्भातून निरोप घेण्याच्या तयारीत असलेला वरुणराजा जाताजाता शेवटचा दणका देण्याची दाट शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा चक्रावातामध्ये रूपांतरित होऊन आंध्र प्रदेशमार्गे विदर्भाच्या दिशेने वेगाने सरकत आहे. त्याच्या तीव्र प्रभावामुळे चार-पाच दिवस विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मंगळवारी काही ठिकाणी मुसळधारेचीही शक्यता आहे. हवामान विभागाचा हा इशारा बळीराजासाठी धोक्याची घंटा आहे. कारण, या पावसामुळे शेतमालांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी दुपारनंतर शहरातील अनेक भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. विदर्भातून निरोप घेण्याच्या तयारीत असलेल्या मॉन्सूनच्या पावसाने अपेक्षेप्रमाणे शहरात जोरदार हजेरी लावली. धुवाधार पावसामुळे जागोजागी पाणी तुंबल्याने विदर्भासह नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. वरुणराजाने दणक्यात हजेरी लावून इशारा खरा ठरविला. काही भागांत हलक्या सरी बरसल्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाचा थेंबही पडला नाही.

दुपारी चारनंतर आभाळ भरून आले. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह अनेक भागांमध्ये अर्धा ते पाऊण तास जोरदार हजेरी लावली. बराच वेळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे अनेकांना आडोशाचा आधार घ्यावा लागला. पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले होते. साडेपाचनंतर पुन्हा पावसाने झोडपून काढले.
हा पाऊस काही पिकांसाठी लाभदायक
विदर्भात चंद्रपूरमध्येही दमदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय वर्धा, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. विदर्भात वरुणराजाचा मुक्काम विकेंडपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. हा पाऊस काही पिकांसाठी लाभदायक मानला जात असला तरी, नुकसानच जास्त होण्याची शक्यता आहे. विशेषतः धान, सोयाबीन व कपाशीला घातक आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता असल्याने बळीराजाचीही चिंता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here