Home latest News एमएस सीआयटीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त* *पनवेलमध्ये उत्तीर्ण , प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांंचा गुणगौरव*
*एमएस सीआयटीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त*
*पनवेलमध्ये उत्तीर्ण , प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांंचा गुणगौरव*
*अरुणकुमार करंदीकर*
*पनवेल शहर प्रतिनिधी*
*मो. क्र. 7715918136*
पनवेल : महाराष्ट्र राज्य शासनमान्य संगणक कोर्स एमएस सीआयटीचा काल दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी रौप्य महोत्सवी वर्धापनदिन होता . त्यानिमित्ताने वर्धापनदिनाचे औचित्य साधुन उत्तीर्ण व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांंचा गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाच्या औचित्याने प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘ किर्ती काॅम्प्युटर्स ‘ पनवेल शाखेच्या वतीने गुणगौरव करुन संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र वितरित करण्यात आले . सदरील कार्यक्रमाचे आयोजन पनवेल शाखेच्या ‘ किर्ती काॅम्प्युटर्स ‘ चे संचालक आयु.अमित भादवे व आयुनी. प्रज्ञा भादवे ह्या उच्चशिक्षित दांपत्यांनी केले होते. .
अमित भादवे हे मागील पंधरा वर्षांपासून शहरी व ग्रामीण भागात संगणक साक्षरतेचा दिप प्रज्वलित करण्याचे कार्य सातत्याने करीत आहेत. त्यांनी व त्यांच्या सहचारिणी आयुनी. प्रज्ञा भादवे यांनी मुंबईतील अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये आयटी विषयांचे स्वतः अध्ययन केल्यानंतर त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांचे करिअर घडवले आहे. सध्या हे दांपत्य ‘ किर्ती काॅम्प्युटर्स ‘ पनवेल शाखेच्या माध्यमातून विविध संगणक कोर्सेसव्दारे विद्यार्थ्यांना नोकरीसाठी तसेच स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवित आहेत. त्यांच्या संस्थेतुन शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आता नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असुन काहींनी स्वतःचा व्यवसाय यशस्वीरीत्या सुरू केलेला आहे.
सदर कार्यक्रमप्रसंगी मुंबईच्या गोवंडी विभागातील माजी नगरसेवक अरुण कांबळे, पत्रकार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुणकुमार करंदीकर, अनिल भादवे, अमोल जाधव, शिवाजी सकटे , श्रीनिवास वालेकर हे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते एमएस सीआयटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. ह्या प्रसंगी माजी नगरसेवक अरुण कांबळे यांनी भादवे दांपत्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील नव्या तांत्रिक बदलांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. तसेच पत्रकार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुणकुमार करंदीकर यांनी सदर संस्थेचे कोर्सेस विद्यार्थ्यांना उद्योग जगताशी जोडणारे आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नव्या करिअरच्या संधीची दारे उघडणारे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या भावना व्यक्त करताना अमित भादवे म्हणाले की, गावोगावातील प्रत्येक युवकाला संगणक प्रशिक्षण मिळावे, हे आमचे स्वप्न आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविणे हेच आमचे ध्येय आहे. ह्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमाने केवळ विद्यार्थ्यांचा गौरव केला नाही तर , शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात परिवर्तन घडविण्याची आम्हाला नवचेतना दिली आहे.
अमित आणि प्रज्ञा भादवे यांचे हे कार्य सिध्द करते की, संकल्प दृढ असेल तर गावोगावातुनही ज्ञानाचे दिवे उजळु शकतात. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातुन अनेक युवकांचे भविष्य उज्वल झाले असून , ही प्रेरणादायी वाटचाल आगामी पिढीसाठी दिशादर्शक ठरणारी आहे. भादवे दांपत्यांनी आपल्या संस्थेत ‘ ना नफा ना तोटा ‘ हे तत्वनिष्ठ धोरण अवलंबले असुन खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंकडुन नाममात्र शुल्क आकारुन त्यांना प्रशिक्षित करण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे. पनवेल सारख्या शहरी व ग्रामीण भागात संगणक साक्षरतेचा दिप प्रज्वलित करण्याचा त्यांचा उपक्रम स्तुत्य असून सामाजिक पातळीवर वाखाणण्याजोगा आहे.