हिंगणघाट अंकिता पिस्सुडे जळीतकांड खटल्याच्या सुनावणीला उद्यापासून सुरुवात: उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद.
हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेली पीडिता 3 फेब्रुवारीला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी 40 टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.
मुकेश चौधरी प्रतिनिधी
हिंगणघाट:- राज्यात गाजलेल्या अंकिता पिस्सुडे यांच्या जळीतकांड प्रकरणाच्या सुनावणीला सोमवारपासून न्यायालयात सुरुवात होणार आहे. या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार उज्ज्वल निकम सोमवारी हिंगणघाट न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी हजर होतील. न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. कोविडमुळे थांबलेल्या या प्रकरणाची सुनावणी उद्या सोमवार पासून सुरू होणार आहे. या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम हिंगणघाट येथे दाखल होणार आहेत. महाराष्ट्रात बहुचर्चित असलेल्या या प्रकरणाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथे प्रेमातून एका माथेफिरुने तरुणीवर पेट्रोल टाकून तिला जाळले होते. सात दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर या तरुणीचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात रोष निर्माण झाला होता. या प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे.
या प्रकरणातील या आरोपी विकेश नगराळे याच्याविरुद्ध 426 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर 26 दिवसांत पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले होते. कोविडमुळे थांबलेल्या या न्यायालयीन कामकाजाला आता वेग आला आहे. हिंगणघाट येथेच अतिरिक्त सत्र न्यायालयात खटला चालविण्यात येणार आहे. यात पहिल्या दिवशीच्या न्यायालयीन कामकाजाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आरोपी नागपूर न्यायालयात –
या प्रकरणाचा आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन महिन्यात निकाल लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कोरोनामुळे न्यायालयीन प्रक्रियेला विलंब झाला.
फास्ट ट्रॅकची परवानगी रखडली –
या प्रकरणात 426 पानांचे आरोपपत्र पोलिसांनी 28 फेब्रुवारीला न्यायालयात दाखल केले आहे. सुरुवातीच्या काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फास्ट ट्रॅक वर्धेला उपलब्ध करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, अद्यापपर्यंत परवानगी न मिळाल्याने हिंगणघाट येथे या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. हिंगणघाटच्या न्यायालयात उद्यापासून कामकाज सुरू होणार आहे.