जोगेश्‍वरी – विक्रोळी लिंक रोडसाठी 1700 झाडांची होणार कत्तल

56

जोगेश्‍वरी – विक्रोळी लिंक रोडसाठी 1700 झाडांची होणार कत्तल

मुंबई:- आरेतील झाडे तोडण्याच्या विरोधानंतर पुन्हा एकदा जोगेश्‍वरी-विक्रोली रोडसाठी तब्बल 1700 झाडांची कत्तल होणार आहे. जोगेश्‍वरी – विक्रोळी लिंक रोडच्या रुंदीकरणाच्या कमासाठी व मेट्रो रेल्वे-2 बी आणि मेट्रो-4 च्या कामात बाधक ठरणारी, अशी एकूण 1,700 झाडे हटविण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिका प्रशासनाने स्थानिक नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत.

आरेमधील झाडे तोडण्यावरून झालेल्या विरोधानंतर आता रस्ते आणि मेट्रोकामासाठी झाडे तोडली जाणार आहेत. याबाबत पालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती काय निर्णय घेते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. जोगेश्‍वरी – विक्रोळी लिंक रोडच्या रुंदीकरणासह मेट्रो 2 बी व मेट्रो 4 च्या कामात अडथळा ठरणारी 1 हजार 700 झाडे हटविण्यात येणार आहेत. जोगेश्‍वरी – विक्रोळी लिंक रोडच्या कामात अडथळा ठरणार्‍या 600 झाडांना अन्य ठिकाणी पुनर्रोपित करणे आणि 120 झाडे कापणे, यासाठी स्थानिक नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. मेट्रो 2 बी च्या कामात अडथळा ठरणारी 800 झाडे कापण्यासाठी अथवा अन्य ठिकाणी पुनर्रोपित करण्यासाठी स्थानिक लोकांना हरकती व सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पर्यावरणप्रेमींकडूनही हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. लोकांच्या हरकती सूचना लक्षात घेत, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जोगेश्‍वरी – विक्रोळी लिंक रोडला अंधेरी पश्‍चिम लोखंडवाला संकुलापर्यत जोडण्याचा निर्णय रस्ते विभागाने घेतला आहे.

जोगेश्‍वरी – विक्रोळी लिंक रोड रुंदीकरणादरम्यान एस.व्ही. रोड अंधेरी येथून एक किलोमीटर लांब व 120 फुट रुंद करण्यात येणार आहे. हा रस्ता दोन लेनमध्ये होणार असून यामुळे लोखंडवाला ते पूर्व एक्सप्रेस हायवेवर जाण्यासाठी लागणार्‍या वेळेची बचत होणार असल्याचे रस्ते विभागातील अधिकार्‍याने सांगितले. मात्र, झाडांचे बळी जाणार आहेत. आरेमधील झाडे तोडण्यावरून झालेल्या विरोधानंतर आता रस्ते आणि मेट्रोकामासाठी झाडे तोडली जाणार आहेत. याबाबत पालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती काय निर्णय घेते याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.