छ. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकाच्या सुशोभिकरणाला गती देण्याची मागणी…!

57

नगरसेविका नंदा रमेश कांबळे यांनी नगर पंचायतकडे केली मागणी…

श्री क्षेत्र माहूरगड प्रतिनिधी

आदित्य खंदारे: माहूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे तात्काळ सुशोभिकरण करण्याची मागणी नगरसेविका नंदा रमेश कांबळे यांनी नगर पंचायतकडे निवेदनाद्वारे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जागेची भूमी अभिलेख कार्यालयातील नोंदीनुसार पुन्हा मोजणी करून क्षेत्रफळ निश्चित करावे, सीमा ठरवून अतिक्रमणमुक्त करावे आणि विकासकामांना त्वरित सुरुवात करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नगर पंचायत सभागृहात दि.१२ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत चौक सुशोभिकरणाबाबत ठराव घेण्यात आला होता. मात्र अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. शिवाजी चौक सुशोभित झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल तसेच नागरिकांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण होईल, असे नगरसेविका नंदा कांबळे यांनी म्हटले आहे. सुशोभिकरणासाठी आवश्यक त्या तातडीच्या कार्यवाहीचे आदेश देण्याची मागणी त्यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे केली आहे.