शारदा शिक्षण मंडळाच्या शाळांचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

32

विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार…

नाशिक जिल्हा प्रतिनिधी : ज्ञानेश्वर तुपसुंदर

नाशिक : श्री शारदा शिक्षण मंडळ संचलित श्रीमती लीलावती बालक मंदिर, मातोश्री चंद्रभागाबाई रामनाथ जाजू माध्यमिक विद्यालय व शेठ रामनाथ नारायणदास जाजू माध्यमिक विद्यालय यांचा संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ (दि. १३) दादासाहेब गायकवाड सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाप्रसंगी श्री शारदा शिक्षण मंडळाच्या संस्थापिका व आदर्श मुख्याध्यापिका कै.चंद्रावती नरगुंदे मॅडम यांच्या स्मरणार्थ स्मृतिगंध या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच माणिक मोती व फुलपाखरू या हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास शारदा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गिरीश नरगुंदे व कवी-लेखक सूर्यकांत वैद्य हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या चिटणीस मायावती बेलसरे, सहचिटणीस रवींद्र आगळे, मनपा माजी स्थायी समिती अध्यक्ष व विश्वस्त अमोल जाधव, विश्वस्त आशा जाजू, रोशन जाजू, नरेंद्र गाखेडकर, शाळेचे मुख्याध्यापक अजय पवार, सौ.सुनंदा भागवत, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी सानप, दिव्या गरुड तसेच प्रस्ताविक , श्री. पवार व आभार सौ.सुनंदा भागवत यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पारितोषिक वितरण करण्यात आले. जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत यश मिळवणारा मयंक देसाई, शिष्यवृत्ती व एन.एम.एम.एस. परीक्षेत उत्तीर्ण समृद्धी राजाराम गुंड, चित्रकला परीक्षेत यशस्वी उन्नती बरेलीकर, हिंदी सप्ताहातील टंकलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारा स्वराज रमेश धारणकर तसेच शैक्षणिक वर्षात प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यानंतर वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास सुरुवात झाली. छोट्या गटापासून ते इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. “चिऊताई चिऊताई माझ्या अंगणात ये गं”, “देवा मला शाळेत जायचं हाय!”, “आदिवासी जंगल रखवाला रे”, शेतकऱ्यांच्या कष्टाचे दर्शन घडवणारे “आम्ही जातीचे शेतकरी खातो कष्टाची भाकरी” तसेच महाराष्ट्राची संस्कृती अधोरेखित करणारे “जय जय महाराष्ट्र माझा” ही गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. नववीच्या विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित प्रभावी नाटक सादर करून प्रबोधनाचा संदेश दिला. प्रत्येक सादरीकरणाला पालकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे, आत्मविश्वास वाढवणारे आणि शिक्षक-पालक-विद्यार्थी यांच्यात स्नेह निर्माण करणारे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता दिसून येते, अभ्यासातील ताणतणाव दूर होऊन आनंद मिळतो आणि अभ्यासाबरोबरच इतर क्षेत्रांमध्येही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळेच दरवर्षी विद्यार्थी या स्नेहसंमेलनाची आतुरतेने वाट पाहत असतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.