आई सोमजाई देवी सप्ताह व भव्य रथयात्रा : श्रीवर्धनमध्ये श्रद्धा-भक्तीचा अनुपम सोहळा

21

आई सोमजाई देवी सप्ताह व भव्य रथयात्रा : श्रीवर्धनमध्ये श्रद्धा-भक्तीचा अनुपम सोहळा

निलेश भुवड

श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी

मो. 8149679123

श्रीवर्धन | नवसाला पावणारी, संकटात धावून येणारी आणि संपूर्ण गावाचे रक्षण करणारी अशी अढळ श्रद्धा असलेल्या आई सोमजाई देवीचा सप्ताह व भव्य रथयात्रा उत्सव श्रीवर्धनमध्ये अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने संपूर्ण नगरीत श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला.

दिनांक १२ नोव्हेंबर रोजी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाला भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. गावकरी, महिला-पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच दूरवरून आलेल्या भाविकांनी आई माऊलीच्या चरणी नतमस्तक होत महाप्रसादाचा लाभ घेतला.

रात्री ठीक १२ वाजता पारंपरिक विधी, मंत्रोच्चार आणि ढोल-ताशांच्या गजरात भव्य रथयात्रेला सुरुवात झाली. “आई माऊलीचा उदो उदो” आणि “जय सोमजाई माऊली” या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला. आकर्षक विद्युत रोषणाईने सजलेला रथ, भक्तांची उसळलेली गर्दी आणि भक्तिभावाने भारलेले वातावरण पाहून अनेक भाविक भावविवश झाले.

सोमजाई देवीच्या स्वागतासाठी कसबा पेठ येथे गणराज मित्र मंडळाने आकर्षक व सुबक अशी फुलांची रांगोळी काढली होती.

आई सोमजाई देवी ही केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून संकटसमयी रक्षण करणारी देवी म्हणून जनमानसात पूजली जाते. त्यामुळेच श्रीवर्धनसह तालुका व जिल्ह्यातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने या उत्सवासाठी दाखल झाले होते. शांतता, शिस्त आणि भक्तिभाव यांचे दर्शन घडवत हा उत्सव यशस्वीपणे पार पडला.

या भव्य सोहळ्यामुळे श्रीवर्धनमध्ये धार्मिक परंपरा, सामाजिक एकता आणि लोकश्रद्धेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली.