धनंजय मुंडे बलात्कार प्रकरण, चहूबाजूंनी घेरलेल्या रेणू शर्मांचं ट्विट.

मुंबई:- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या रेणू शर्मा यांनी आता या प्रकरणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. रेणू शर्मा यांनी ट्विट करून या प्रकरणातून माघार घेत असल्याचं म्हटलं आहे. सगळेच मिळून माझ्यावर चुकीचे आरोप करत आहेत. तर आता मीच माघार घेते, असं ट्विट रेणू यांनी केलं आहे. चहूबाजूंनी घेरल्या गेल्यामुळे रेणू यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

रेणू शर्मा यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करून माघार घेत असल्याचं म्हटलं आहे. एक काम करा, आता तुम्ही सर्व मिळूनच निर्णय घ्या. काहीही माहिती नसणारे आणि मला ओळखणारे लोकही माझ्यावर चुकीचे आरोप लावत आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मिळून निर्णय घ्या. मीच माघार घेते. तुम्हालाही तेच हवं आहे ना?, असं रेणू यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

जर मी चुकीची होती तर माझ्याविरोधात बोलण्यासाठी एवढे लोक का आले नाहीत? मी माघार घेतली तरी मला माझ्याबद्दलचा अभिमान असेल. कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव न घेता मी एकटी मुलगी महाराष्ट्रात लढत होते. आणि आता मला कमी लेखण्यासाठी एवढ्या लोकांना पुढे यावं लागलं आहे. आता तुम्हा सर्वांना जे लिहायचे ते लिहित बसा. देव तुमचं भलं करो, असं रेणूने पुढच्या दोन्ही ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप केल्याने मंत्रिमहोदयांच्या अडचणी वाढल्या. असं असलं तरी रेणू शर्मा यांच्याविरोधातही तक्रारी वाढत असल्याने हे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरॅंग होताना दिसत आहे. कारण रेणू शर्मा यांच्याविरोधात खुद्द धनंजय मुंडे यांनी तर तक्रार केली आहेच, पण त्यांच्याविरोधात इतर तीन तक्रारीही दाखल झाल्या आहेत. जर केवळ धनंजय मुंडे यांचीच तक्रार असती तर एकमेकांविरोधात तक्रार असं समजून प्रकरणाला तितकंस गांभीर्य आलं नसतं. पण अन्य तीन तक्रारी, त्याही बड्या नेत्यांच्या तक्रारी असल्याने प्रकरण आणखी गंभीर बनलंय.भाजपचे माजी मंत्री कृष्णा हेगडे, मनसे नेते मनिष धुरी आणि विमान कंपनीतील अधिकारी रिझवान शेख यांनी रेणू विरोधात तक्रार केल्याने रेणू शर्मा गोत्यात आल्या होत्या. त्यामुळे रेणू या मुंडें यांना ब्लॅकमेल करत असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी या प्रकरणातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here