अनुसूचित जातीतील नवउद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया योजना.
✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधि
नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीवर्षानिमित्त नवउद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया ही योजना सुरु करण्यात आली आहे. केंद्र शासनाची ही योजना असून या योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरीता मार्जिम मनी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत राज्यात सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या त्यांच्या हिश्यामधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के मार्जिन मनी (Front and Subsidy) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या योजनेत नवउद्योजक यांना 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत Front and Subsidy 15 टक्के राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येईल. या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थ्यांनी राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवउद्योजकांनी जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे प्रस्ताव सादर करावे. सदर योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक यांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.